मुंबई - Year Ender 2023 :हिंदी चित्रपटसृष्टीसाठी 2023 वर्ष उत्तम वर्ष ठरले. 2023 वर्षात अनेक चित्रपट आणि वेब सीरीज ओटीटीवर प्रदर्शित झाले. हे चित्रपट आणि वेब सीरीज खूप लोकप्रिय झाल्या आहेत. इयर एंडरच्या या विशेष लेखात आपण 2023 च्या लोकप्रिय चित्रपट आणि वेब सीरीजबद्दल सांगणार आहोत, ज्या सत्य घटनेवर आधारित आहेत.
ट्वेल्थ फेल:विधू विनोद चोप्रा दिग्दर्शित 'ट्वेल्थ फेल' हा चित्रपट आयपीएएस अधिकारी मनोज कुमार शर्मा आणि श्रद्धा जोशी यांच्या आयुष्यावर आधारित आहे. हा चित्रपट 27 ऑक्टोबर 2023 रोजी बॉक्स ऑफिसवर रिलीज झाला. या चित्रपटानं प्रेक्षकांच्या हृदयावर अमिट छाप सोडली आहे. दरम्यान आता हा चित्रपट 29 डिसेंबर रोजी डिस्ने प्लस हॉटस्टार प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटात विक्रांत मॅसी मेधा शंकर, अनंत व्ही जोशी, अंशुमन पुष्कर आणि प्रियांशू चॅटर्जी या कलाकारांनी काम केलं आहे. 20 कोटींच्या बजेटमध्ये बनलेल्या या चित्रपटानं 62 कोटीची बॉक्स ऑफिसवर कमाई केली.
द रेल्वे मेन : आर. माधवन, केके मेनन, दिव्येंदू आणि बाबिल खान स्टारर 'द रेल्वे मेन' वेब सीरीज ही भोपाळ गॅस दुर्घटनेवर आधारित आहे. 2 डिसेंबर 1984 रोजी भोपाळ गॅस दुर्घटना घडली होती. 'द रेल्वे मेन' ही वेब सीरीज 18 नोव्हेंबर रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती. या वेब सीरीजला प्रेक्षकांची चांगली पसंती मिळाली. 'द रेल्वे मेन' वेब सीरीजचं दिग्दर्शन शिव रवैल यांनी केलं आहे.
सॅम बहादूर :विकी कौशल स्टारर 'सॅम बहादूर' हा चित्रपट 1 डिसेंबर रोजी चित्रपटगृहांमध्ये रिलीज झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन मेघना गुलजार यांनी केलं आहे. हा चित्रपट भारताचे पहिले फील्ड मार्शल सॅम माणेकशॉ यांच्यावर आधारित आहे, ज्यांनी 1971 च्या भारत-पाकिस्तान युद्ध आणि बांगलादेशच्या स्वातंत्र्यादरम्यान महत्त्वपूर्ण भूमिका बजावली. हा चित्रपट झी5वर 26 जानेवारी 2024 रोजी प्रदर्शित होणार आहे. या चित्रपटामध्ये विकीशिवाय फातिमा सना शेख आणि सान्या मल्होत्रा प्रमुख भूमिकेत आहेत.
मिशन राणीगंज :अभिनेता अक्षय कुमार आणि परिणीती चोप्रा अभिनीत 'मिशन राणीगंज' चित्रपट 6 ऑक्टोबर रोजी थिएटरमध्ये रिलीज झाला. हा चित्रपट 1989 मध्ये पश्चिम बंगालमधील राणीगंज येथे कोळसा खाणीत कामगारांना वाचवण्यासाठी दिवंगत जयवंत सिंग गिल यांच्या धाडसी मोहिमेवर आधारित आहे. 'मिशन राणीगंज' नेटफ्लिक्सवर 1 डिसेंबर रोजी रिलीज झाला. या चित्रपटाचं दिग्दर्शन टीनू सुरेश देसाई यांनी केलं आहे.
स्कूप :करिष्मा तन्ना स्टारर'स्कूप'चं दिग्दर्शन हंसल मेहता यांनी केलं आहे. या सीरीजमध्ये करिष्मा जागृती नामक जर्नलिस्टच्या भूमिकेत आहे. ही वेब सीरीज जिग्ना व्होरा यांच्या 'माय डेज इन प्रिझन' यांच्या पुस्तकावर आधारित आहे. 2011 मध्ये ज्येष्ठ पत्रकार ज्योतिर्मय डे यांच्या हत्येचा कट रचल्याच्या आरोपावरून जिग्नाला मुंबई पोलिसांनी अटक केली होती. ही वेब सीरीज 2 जून 2023 रोजी नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झाली होती.