मुंबई- सध्या शाळांना सुट्ट्या लागल्या आहेत आणि लहान मुले मजामस्ती करण्यात गुंतली आहेत. शाळेतील जीवन हे सर्वाधिक बेस्ट असते याची त्यांना सुतराम कल्पना नसणार. शाळा कधी सुरु होणार हे आठवायलाही ते तयार नसतात. परंतु शाळा सुटली म्हणजेच दहावी संपली म्हणजे कॉलेजात जाण्यासाठी पोरं उत्सुक असतात. मग डिग्री वगैरे मिळवून कामकाजाला लागल्यानंतर जाणवते की, आयला, आपले शाळेतील दिवस किती मस्त होते. तेव्हा जाणवते की शाळा आणि त्यावेळची निरागसता यांचे भावनिक नाते आता पुन्हा अनुभवता येणार नाही. फक्त शाळेतील आठवणींत रमणे हेच आपल्या हाती उरते. याच भावना आणि विषय घेऊन एक चित्रपट बनला आहे ज्याचे नाव आहे ‘बॅक टू स्कूल'. या चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत सतिश महादु फुगे. अनेकांच्या जीवनातील शालेय आठवणींना उजाळा देण्याचे काम हा सिनेमा करेल असे ते सांगतात.
बॅक टू स्कूल पोस्टर झाले प्रदर्शित - 'बॅक टू स्कूल' ची निर्मिती रंगसंस्कार प्रॉडक्शन तर्फे झाली असून नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर समाज माध्यमांवर प्रदर्शित करण्यात आले. तसेच चित्रपटाची प्रदर्शन तारीखही जाहीर करण्यात आली आहे. पोस्टरवर एक शाळा दिसत असून एक पाटी आणि दोन खडू सुद्धा दिसत आहेत. यावरून कल्पना येते की हा चित्रपट शाळेच्या भावविश्वात घेऊन जाईल. या चित्रपटाचे निर्माते आहेत शुभांगी सतिश फुगे आणि सतिश महादु फुगे तसेच चित्रपटाची कार्यकारी निर्माती आहे प्राची सतिश फुगे. छायांकनाची जबाबदारी श्रीनिवास नामदेव गायकवाड यांनी सांभाळली आहे. कथा, पटकथा आणि संवाद सतिश महादु फुगे आणि अमित नंदकुमार बेंद्रे यांच्या लेखणीतून उतरले आहेत.
कलाकारांची मोठी फौज - या चित्रपटात जवळपास सव्वाशे कलाकार काम करीत आहेत. या चित्रपटात सौरभ गोखले, निशिगंधा वाड, स्नेहा चव्हाण, सुरेश विश्वकर्मा, श्वेता पगार, आधिश पायगुडे, विपीन बोराटे, चंद्रकांत कुऱ्हाडे, सोमनाथ रसाळ, नितीन बनसोडे, अमृत झांबरे, अभिजित पटणे, रुपाली पाथरे, किरण झांबरे, डॉ. परिणिता पावसकर, मोहिनी कुडेकर, श्वेता कामत, सुप्रिया मागाडे, यशा पाळणकर, भूमी दळी, ईशा अग्रवाल, प्रसाद कुलकर्णी, विराज जाधव,आयुष जगताप, तुषार गायकवाड, यश बिरे, रतनहरी फड, कैवल्य हरिश्चंद्रे, अजिंक्य गायकवाड, आर्या घारे, विशाखा अडसूळ, प्रगती पिंगळे, हिमांगी टपळे, शर्वरी साठे, तन्वी गायकवाड, नंदिनी पाटोळे, साक्षी शेळके, मौली बिसेन आणि आर्या कुटे यांच्या भूमिका आहेत.