मुंबई - Manik Bhide passed away: जयपूर घराण्यातील गायिका माणिक भिडे यांचं निधन वयाच्या ८८ व्या वर्षी झालंय. गेल्या अनेक वर्षांपासून त्या पार्कीन्सन्स या आजारानं ग्रस्त होत्या. माणिक भिडे यांच्या निधनानं संगीतविश्वावर शोककळा पसरली आहे. माणिक भिडे जयपूर घराण्याच्या ज्येष्ठ गायिका होत्या. त्या किशोरी आमोणकर यांच्या शिष्य होत्या. 'गानसरस्वती' किशोरी आमोणकर यांचं 2017 साली निधन झालं. माणिक भिडे या त्यांच्या खास शिष्या होत्या.
माणिक भिडेचं निधन : माणिक भिडे यांनी लहान वयातच शास्त्रीय संगीताचे धडे गिरवायला सुरुवात केली होती. जयपूर अत्रौली घराण्याचे गायक मधुकर सडोलीकर यांच्याकडे त्यांनी प्राथमिक संगीत शिकलं होतं. त्याच सुमारास त्यांनी आकाशवाणीच्या पुणे केंद्रात गायिका म्हणून काम केलं. विल्सन कॉलेजमध्ये भौतिकशास्त्र शिकवणाऱ्या गोविंद केशव ऊर्फ मोहन भिडे यांच्याशी त्यांच लग्न झाल्यावर त्या मुंबईत स्थायिक झाल्या. प्रख्यात गायिका मोगुबाई कुर्डीकर यांची कन्या किशोरी आमोणकर यांच्याबरोबर योगायोगाने झालेल्या सांगीतिक भेटीनंतर माणिक ताईं या किशोरी ताईंच्या शिष्या झाल्या. तब्बल 15-16 वर्षे त्यांनी किशोरी ताईंकडे शास्त्रशुद्ध संगीत प्रशिक्षण घेतलं आणि आपल्या गायकीनं तमाम संगीतप्रेमींना त्यांना आनंद दिला. संगीतक्षेत्रात त्यांनी दिलेलं योगदान उल्लेखनीय असून शासनानं याची दाखल घेत त्यांना 2017मध्ये पं. भीमसेन जोशी पुरस्कार देऊन गौरविले.