मुंबई - 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1' या चित्रपटाने गेल्या वर्षी थिएटरमध्ये प्रेक्षकांना खेचून आणण्याचे काम केले होते. आनंद दिघे यांच्या जीवनावर आधारित या चित्रपटाने प्रेक्षकांचे मनोरंजन तर केलेच पण त्याच वेळी आनंद दिघेंचे कार्य महाराष्ट्रभर पोहोचवले. या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवरही जबरदस्त कामगिरी केली आणि यामुळे निर्मात्यालाही मोठे बळ मिळाले.
या चित्रपटाचा दुसरा भाग येणार अशी चर्चा अगदी सुरुवातीपासूनच होती. याबद्दल निर्माता मंगेश देसाई आणि दिग्दर्शक प्रविण तरडे यांना आत्मविश्वास होता. आता या चित्रपटाच्या निर्मितीची घोषणा मंगेश देसाईने केली आहे. मंगेशने सोशल मीडियावर एक पोस्ट लिहून चाहत्यांना कळवले की, 'अनेक दिवसांपासून सुरु असलेली चर्चा आता प्रत्यक्षात उतारणार...सांगण्यास अतिशय आनंद होत आहे की, जेजुरी येथील खंडोबाचे दर्शन घेऊन आज तुमच्या सर्वांच्या प्रेमाने आणि आशीर्वादने 'धर्मवीर २' ची आज मी अधिकृत घोषणा करत आहे.'
काल दिग्दर्शक प्रविण तरडेसह मंगेश देसाई यांनी जेजूरीच जाऊन खंडोबाचे दर्शन घेतले. त्यावेळी चित्रपट निर्मितीसंबंधी इथे आलो असल्याचे सूतोवाच त्याने केले होते. मंगेशने फेसबुक पोस्टमध्ये लिहिले होते, 'धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे भाग 1 च्या माध्यमातून धर्मवीर आनंद दिघे साहेबांचं चरित्र सगळ्या जनतेसमोर आलं. धर्मवीर आनंद दिघे साहेब यामाध्यमातून सर्व जगात पोहोचले आणि 'असा माणूस होणे नाही' हेही सर्वांना समजलं. त्यांचा आयुष्यातील अशा भरपूर गोष्टी आहेत ज्या जनतेसमोर येणं गरजचं आहे, म्हणूनच 'धर्मवीर - मुक्काम पोस्ट ठाणे - भाग 2 ह्याचं चित्रीकरण आम्ही सुरू करतोय, लवकरच...बघुया धर्मवीर मुक्काम पोस्ट ठाणे 2..साहेबांच्या हिंदुत्वाची गोष्ट, लवकरच...'
धर्मवीर चित्रपट जेव्हा रिलीज झाला तेव्हा त्याचे खास स्क्रिनिंग तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासाठी ठाण्यात आयोजित केले होते. यावेळी सध्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यासाठी खास हजर होते. ठाकरे यांनी चित्रपटाचा शेवट पाहणे टाळले होते. कारण आनंद दिघे यांचा अखेर होताना त्यांना पाहायचे नव्हते. हा चित्रपट रिलीज झाला आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांनी त्याचे जोरदार स्वागत केले. प्रेक्षकांनीही उत्तम प्रतिसाद दिला. त्यानंतर सुरू झाले महाराष्ट्राच्या राजकारणात घडलेले सत्तांतर नाट्य. या पार्श्वभूमीवर धर्मवीर सिनेमालाही एक महत्व आहे. आता या सिनेमाचा दुसरा भाग येत असताना शिवसेना दुभंगली आहे. अशावेळी धर्मवीर चित्रपटाचा दुसरा भाग प्रेक्षकांच्या भेटीस आणला जात आहे. या चित्रपटातून बाळासाहेबांचे हिंदुतव या विषयावर भाष्य होणार असल्यामुळे आगामी काळाच्या राजकीय घडामोडींना एक दिशा हा चित्रपट देऊ शकतो.