मुंबई : साऊथ सुपरस्टार महेश बाबू आज खूप लोकप्रिय आहे. आपल्या दमदार अभिनयाच्या जोरावर त्यांने स्वत:ची खास ओळख चित्रपटसृष्टीत निर्माण केली आहे. महेश बाबू हा साऊथ चित्रपटांतील सर्वात यशस्वी अभिनेत्यांपैकी एक आहे. टॉलिवूडचा प्रिन्स म्हणून त्यांची ओळख चित्रपसृष्टीत आहे. महेश बाबूची क्रेझ केवळ दक्षिण भारतातच नाही तर संपूर्ण देशात पाहायला मिळते. चित्रपटसृष्टीत त्याने अनेक ब्लॉकबस्टर चित्रपट दिले आहेत. चाहते त्याच्या चित्रपटांची आतुरतेने वाट पाहत असतात. जेव्हाही तो मोठ्या पडद्यावर एन्ट्री करतो तेव्हा संपूर्ण थिएटर टाळ्या आणि शिट्ट्यांनी गुंजते. आज महेश बाबू त्याचा ४८वा वाढदिवस साजरा करत आहे. या खास दिवसानिमित्त जाणून घेऊया त्याच्याबद्दल काही रंजक गोष्टी....
महेश बाबूचा वाढदिवस : महेश बाबूचा जन्म ९ ऑगस्ट १९७५ रोजी चेन्नईमध्ये साऊथ इंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेता निर्माता-दिग्दर्शक शिवा राम कृष्ण घट्टमनेनी यांच्या घरी झाला. बालकलाकार म्हणून महेश बाबूने आपल्या कारकिर्दीला सुरुवात केली. त्याने वयाच्या चौथ्या वर्षी 'नीदा' चित्रपटात काम केले होते. त्यांनंतर महेश बाबूने हिरो म्हणून 'राजकुमारुडू' या चित्रपटातून करिअरला सुरुवात केली. या चित्रपटाद्वारे त्याने टॉलिवूडमध्ये पदार्पण केले.
इतके मिळाले पुरस्कार :महेश बाबूचे बालपण मद्रासमध्ये त्याच्या आजीसोबत गेले. त्यांने चेन्नईच्या कॉलेजमधून वाणिज्य शाखेत पदवी संपादन केली. पदवीनंतर महेश बाबूने अभिनय प्रशिक्षणासाठी दिग्दर्शक एल सत्यानंद यांना भेटले. त्यानंतर काही दिवस महेश बाबूने त्याच्याकडून अभिनयाचे शिक्षण घेतले. महेश बाबूला आता देखील तेलुगू लिहिता-वाचता येत नाही. मात्र ते तेलुगूमध्ये संवाद करू शकतात. महेश बाबूला अभिनयासाठी आठ 'नंदी पुरस्कार', पाच 'फिल्मफेअर दक्षिण पुरस्कार', चार 'दक्षिण भारतीय आंतरराष्ट्रीय' 'चित्रपट पुरस्कार', आणि एक 'आयफा उत्सव पुरस्कार' मिळाले आहेत.