मुंबई - Mahesh babu :'गुंटूर कारम'च्या प्रमोशनल कार्यक्रमात महेश बाबू भाषण देत असताना भावूक झाला. 9 जानेवारी रोजी आंध्र प्रदेशातील गुंटूर येथे हा भव्य कार्यक्रम झाला होता. या कार्यक्रमात हजारो चाहत्यांनी हजेरी लावली होती. महेश बाबूनं भाषणादरम्यान सांगितलं की, ''ही येणारी संक्रांती त्याच्यासाठी खूप वेगळी आहे, कारण त्याचे वडील पहिल्यांदा त्याच्यासोबत नसतील.'' पुढं त्यानं म्हटलं की, ''माझे चाहते माझ्यासाठी सर्व काही आहेत.'' त्यानंतर महेश बाबूला अश्रू अनावर झाले. दरम्यान 'गुंटूर कारम'च्या प्री-रिलीज इव्हेंटनंतर, त्यानं चाहत्यांसाठी एक आभार मानणारी नोट पोस्ट शेअर केली.
महेश बाबूनं शेअर केली पोस्ट :महेश बाबूनं या पोस्टला कॅप्शन देत लिहिलं, "धन्यवाद, गुंटूर! खूप प्रेमाने वेढलेल्या माझ्या गावामध्ये हा कार्यक्रम साजरा करणे, ही एक माझी आठवण आहे, जी मी माझ्या हृदयाच्या जवळ ठेवीन. माझं तुम्हा सर्वांवर प्रेम आहे. माझ्या सुपरफॅन्सला मी पुन्हा भेटण्यासाठी उत्सुक आहे. संक्रांती आता सुरू होत आहे! संपूर्ण कार्यक्रमात गुंटूर पोलिसांच्या सहकार्याबद्दल धन्यवाद.'' दुसरीकडे, नम्रतानं सोशल मीडियावर महेश बाबूच्या चाहत्यांचे मनापासून आभार मानले आहे. महेश बाबूचा आगामी चित्रपट 'गुंटूर कारम' गेल्या काही दिवसांपासून चर्चेत आहे. या चित्रपटाचे निर्माते सध्या प्रमोशनसाठी खूप मेहनत घेत आहेत.