मुंबई - Kriti Sanon : अभिनेत्री क्रिती सेनॉन ही राष्ट्रीय पुरस्कार जिंकल्यामुळं सध्या चर्चेत आहे. तिला 'मिमी' चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला आहे. दरम्यान एका ट्रेडिंग अॅपची जाहिरात केल्याचा आरोप झाल्यानंतर ती पुन्हा एकदा वादाच्या भोवऱ्यात सापडली आहे. क्रितीनं करण जोहरच्या 'कॉफी विथ करण 8' शोमधील ट्रेडिंग प्लॅटफॉर्मच्या तिच्या कथित प्रमोशनशी संबंधित वृत फेटाळून लावलं आहे. याशिवाय तिनं फेक न्यूज पसरवणाऱ्यांवर कायदेशीर कारवाई करणार असल्याचं म्हटलं आहे. अलीकडेच करण जोहरच्या चॅट शो 'कॉफी विथ करण'मध्ये दिसली. या शोदरम्यान तिनं ट्रेडिंग अॅपचा प्रचार केला, असा आरोप तिच्यावर लावण्यात आला होता.
क्रिती सेनॉननं शेअर केली पोस्ट :क्रिती सेनॉननं आज 3 डिसेंबर रोजी इंस्टाग्राम अकाउंटवर एक पोस्ट शेअर केली आहे. सोशल मीडियावर स्पष्टीकरण देण्यासोबतच तिनं अधिकृत निवेदनही जारी करून अशा बातम्यांवर नाराजी व्यक्त केली आहे. या पोस्टमध्ये तिनं लिहिलं, 'असे अनेक चुकीची माहिती देणारे लेख सतत समोर येत आहेत, ज्यात असे लिहिले जात आहे की, मी कॉफी विथ करणमध्ये ट्रेडिंग प्लॅटफॉर्मचा प्रचार केला आहे, असं सांगणारे लेख पूर्णपणे खोटे आणि चुकीचे आहेत आणि अप्रामाणिकपणे आणि चुकीच्या हेतूने प्रकाशित केले जात आहेत'. पुढं तिनं म्हटलं, 'अशा लेखांमुळं बदनामी करण्याच्या उद्देशानं मला ट्रेडिंग प्लॅटफॉर्मशी जोडल्याचा खोटा दावा केला जात आहे. मी कोणत्याही शोमध्ये ट्रेडिंग प्लॅटफॉर्मशी संबंधित काहीही बोलले नाही'.