मुंबई : हृतिक रोशनचा 'कोई मिल गया' चित्रपटाने २००३ साली बॉक्स ऑफिसवर खूप कमाई केली होती. या चित्रपटाने प्रेक्षकांवर चांगलीच जादू केली होती. हा चित्रपट पाहण्यासाठी लहान मुलांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांनीच चित्रपटगृहांकडे मोर्चा वळवला होता. दुसरीकडे, हा चित्रपट हृतिक रोशनच्या रुळलेल्या कारकिर्दीसाठी संजीवनीसारखा ठरला. या महिन्यात 'कोई मिल गया' या चित्रपटाच्या रिलीजला २० वर्षे पूर्ण होत आहेत. यानिमित्ताने या चित्रपटाचे निर्माते हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित करण्याच्या तयारीत आहेत. 'कोई मिल गया' चित्रपटाला २० वर्षे पूर्ण झाल्याच्या निमित्ताने हा चित्रपट ४ ऑगस्टला पीवीआर (PVR) आणि आयनॉक्स (INOX)मध्ये ३० शहरांमध्ये रिलीज होणार आहे. 'कोई मिल गया' या चित्रपटाचे दिग्दर्शन राकेश रोशन यांनी केले होते.
राकेश रोशन केला खुलासा : या चित्रपटात हृतिक रोशन व्यतिरिक्त प्रीती झिंटा, रेखा, नसीरुद्दीन शाह हे कलाकार होते. दरम्यान मीडिया मुलाखतीदरम्यान राकेश रोशनने खुलासा केला की त्यांनी हा चित्रपट त्यांचा मुलगा हृतिकच्या अभिनय कौशल्यावर प्रकाश टाकण्याच्या उद्देशाने बनवला होता. राकेश रोशनने पुढे सांगितले, 'कहो ना प्यार है' या त्याच्या पहिल्या चित्रपटाच्या शानदार यशानंतर हृतिकचे सलग आठ चित्रपट फ्लॉप झाले. मीडियाने हृतिकला फ्लॉप हिरो म्हणण्यास सुरूवात केली. 'कोई मिल गया'मधून हृतिकने स्वत:ला सिद्ध केले. तो पूर्णपणे त्याच्या पात्रात उतरला'. या चित्रपटात हृतिक एका मानसिकदृष्ट्या कमकुवत मुलाच्या भूमिकेत दिसला होता. ही भूमिका साकारण्यासाठी त्यांनी विशेष तयारी केली होती. राकेश रोशनने खुलासा केला की, 'शूटच्या आधी एक आठवडा हृतिकने स्वत:ला एका खोलीत बंद केले होते. यानंतर तो थेट शूटिंगला पोहोचला. जेव्हा पहिला शॉट दिला तेव्हाच मला समजले की त्याला त्याचे पात्र नीट समजले.