महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / entertainment

Ankush release date : मंगेश देसाई आणि केतकी माटेगावकर नव्या धमाक्यासाठी सज्ज, 'अंकुश' प्रदर्शनाच्या वाटेवर - मंगेश देसाईचा दमदार लूक

मंगेश देसाई आणि केतकी माटेगावकर नव्या धमाक्यासाठी सज्ज झाले आहेत. दोघेही 'अंकुश' चित्रपटात करारी भूमिकेत दिसत असून या चित्रपटातील दोघांचेही फर्स्ट लूक यापूर्वीच प्रसिद्ध झाले आहेत. निर्मात्यांनी चित्रपटाचे प्रमोशन करायला सुरूवात केली असून हा चित्रपट ६ ऑक्टोबर रोजी प्रदर्शित होणार आहे.

Ankush release date
'अंकुश' रिलीज तारखेची घोषणा

By

Published : Jul 28, 2023, 1:00 PM IST

Updated : Jul 28, 2023, 1:43 PM IST

मुंबई - मंगेश देसाई आणि केतकी माटेगावकर यांच्या प्रमुख भूमिका असलेला 'अंकुश' हा मराठी चित्रपट प्रदर्शनासाठी सज्ज झाला आहे. निर्मात्यांनी 'अंकुश' येत्या ६ ऑक्टोबरला प्रदर्शित करण्याचा निर्णय घेतला आहे. १९८६ साली एन चंद्रा या मराठमोळ्या दिग्दर्शकाने याच शीर्षकाचा हिंदी चित्रपट बनवला होता. त्यात नाना पाटेकर, विजय पाटकर, सुहास पळशीकर, रवी पटवर्धन, आशालता वागबावकर सारख्या अनेक मराठी कलाकारांनी महत्त्वाच्या व्यक्तिरेखा साकारल्या. आता येऊ घातलेल्या मराठी 'अंकुश' मध्ये मंगेश आणि केतकीव्यतिरिक्त कोण असणार, हे मात्र गुलदस्त्यात आहे. दरम्यान, मंगेश देसाईचा 'साजनभाई' या व्यक्तिरेखेतला रफटफ लुक प्रेक्षकांसमोर आला आहे.

मंगेश देसाईचा दमदार लूक - मंगेश देसाई गेली २५ वर्षे अभिनय क्षेत्रात कार्यरत आहे. त्यांची निर्मिती असलेल्या 'धर्मवीर- मुक्काम पोस्ट ठाणे' या चित्रपटाने प्रचंड लोकप्रियता मिळविली. व्यक्तिशः मंगेशला निर्मात्यापेक्षा अभिनेता म्हणून ओळखला जाणे अधिक भावते. विनोदी भूमिकांमध्ये टाइपकास्ट न होता 'लालबत्ती', 'जजमेंट'सारख्या चित्रपटांमधून मंगेशला आपल्या अभिनयाची ताकद दाखवण्याची संधी मिळाली. आता 'अंकुश' च्या निमित्ताने त्याला साजनभाईच्या व्यक्तिरेखेतून पुन्हा एकदा आपल्या अभिनयाचे खणखणीत नाणे वाजवून दाखवता येणार आहे. राजाभाऊ घुले यांचा हा निर्माता म्हणून पहिलाच चित्रपट आहे.

केतकी माटेगवकरही राडा करण्यासाठी सज्ज- मंगेश व्यतिरिक्त या चित्रपटात केतकी माटेगावकर एका करारी भूमिकेत दिसणार आहे, याची उकल आधीच झाली होती. यात केतकीच्या पोस्टरमागे बराच राडा सुरु असल्याचे दिसत आहे. यावर ती कसा 'अंकुश' ठेवणार हे पाहणे औत्सुक्याचे असणार आहे. मंगेश आणि केतकी यांच्या व्यक्तिरेखा सकारात्मक आहेत, की ग्रे छटा असलेल्या, या प्रश्नाचे उत्तरही मिळायचे आहे. चित्रपटाच्या टीजरला चांगला प्रतिसाद मिळत आहे.

चित्रपटात कोणती व्यक्तिरेखा कोणावर, किती आणि कसला 'अंकुश' ठेवणार, या प्रश्नाचे उत्तर मिळवण्यासाठी ६ ऑक्टोबरपर्यंत वाट पाहावी लागेल.

Last Updated : Jul 28, 2023, 1:43 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details