मुंबई - बॉलिवूडमधील बिनधास्त आणि निडर व्यक्तिमत्व म्हणजे कंगना रनौत. कंगनाने बॉलिवूड मधील प्रथापितांविरोधात बिनदिक्कत व्यक्तव्ये केली. स्पष्टवक्ती म्हणून तिची ख्याती असून तिच्या बिनधास्त वक्तव्यांमुळे बॉलिवूडमध्ये तिचे मित्र कमी आणि दुश्मन जास्त झाले आहेत. तिला बॉयकॉट करण्याचा प्रयत्न झाला असे तिचे म्हणणे आहे. ह्रितिक रोशन, जावेद अख्तर, दीपिका पदुकोण, आलिया भट, रणबीर कपूर, करण जोहर इत्यादी अनेक सेलिब्रिटीजच्या विरोधात तिने वक्तव्ये केलेली आहेत आणि त्यामुळे बॉलिवूडमधील आतल्या गोटातील कंपूची कमान तिच्या मते, करण जोहरच्या हाती आहे. तो तिच्यावर खार खातो आणि तिला दमात घेण्याचा प्रयत्न करतो. तिच्या नेपोटीझम वरील घणाघाती मतांमुळे देशभरात त्यावरून वादविवाद सुरु झाले ते अजून शमण्याचे नाव घेत नाहीयेत. या सर्व घडामोडींमुळे कंगनाने चक्क स्वतःच निर्मिती क्षेत्रात उतरण्याचा निर्णय घेतला आणि तिची निर्मिती संस्था मणिकर्णिका फिल्म्सचे पहिले पुष्प आहे ‘टिकू वेड्स शेरू’. या चित्रपटाची निर्मिती कंगनाने ऍमेझॉन प्राईम सोबत केली असून तिच्या मते तिचे हे पहिले बाळ आहे. नुकतीच आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम यांनी कंगना रानौतची भेट घेतली आणि विविध विषयांवर गप्पा मारल्या.
कंगना मॅम, निर्माती होणं हे खूप जिकिरीचं काम आहे ज्यात गणित पक्के असावं लागतं. तुमचा काय अनुभव आहे?
माझ्या मते निर्मात्याचे काम सर्वात कठीण काम आहे. खरंतर स्टार सिस्टिमच्या मायाजालात निर्मात्यांना कमी लेखलं जातं. निर्माता नसेल तर चित्रपट बनणारच नाही. परंतु याच स्टार सिस्टिमने बऱ्याचदा निर्मात्यांना भिकेला लावले आहे. त्यांच्या गलेलठ्ठ मानधनामुळे कधी कधी निर्माते ‘टकले’ झालेले आहेत. आधीच्यांचे अनुभव पाहता निर्माता होणे फारशी आल्हाददायक जागा नाहीये. इथे एक गोष्ट प्रकर्षाने जाणवते आणि ती म्हणजे या इंडस्ट्रीत पाऊल टाकण्यासाठी सिद्ध झालेले जवळपास सर्वचजण फक्त अभिनेता वा अभिनेत्री बनण्यासाठी आलेले असतात. लेखक, दिग्दर्शक, कॅमेरामन वा निर्माता बनण्यासाठी फार जणं उत्सुक नसतात. या इंडस्ट्रीत नाव फक्त अभिनेत्यांचे होते म्हणून असेल कदाचित परंतु हे बदलण्याचा प्रयत्न देखील होत नाही ही खंत आहे. त्यामुळेच जेव्हा मी निर्माती व्हावयाचे ठरविले तेव्हा मला भीती वाटली होती. चित्रपट चालला तर ठीक अन्यथा आर्थिक नुकसान निर्मात्याचेच होते.
निर्माती बनताना मला अनेक प्रश्नांनी अनेक ग्रासले होते. सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतील ना? कलाकार वेळेवर येतील ना? दिग्दर्शक वेळेत शूट कम्प्लिट करू शकेल ना? वितरक चांगले मिळतील ना? शुटिंग्सचे लोकेशन्स चांगले असतील ना? ठरलेल्या बजेटमध्ये चित्रपट पूर्ण होईल ना? असे एक ना अनेक प्रश्न मला भेडसावत होते. तरीही मी पुढे जायचे ठरविले. परंतु निर्माता नेहमी इतरांवर अवलंबून असतो. लेखकाने चांगली संहिता लिहिली पाहिजे. दिग्दर्शकाने त्यावर योग्य सोपस्कार केले पाहिजेत. कलाकारांनी त्यात दमदार अभिनय केला पाहिजे कारण कधी कधी कलाकारांच्या खासगी प्रॉब्लेम्समुळे त्यांच्या त्या दिवशीच्या अभिनयावर परिणाम होतो. अशा अगणित गोष्टींवर निर्माता अवलंबून असतो. त्यामुळे तो सतत तणावाखाली असतो.
या सर्व गोष्टी विचारात घेता मी सुरुवातीला एका लहान चित्रपटाने सुरुवात करण्याचे ठरविले. उगाचच १५-२० मोठे कलाकार घेऊन मला माझ्या डोक्याला ताप द्यायचा नव्हता. फक्त दोन मुख्य कलाकार असलेले स्क्रिप्ट मी निवडले. त्यामुळे अन्य फाफटपसाऱ्याला चान्स नव्हता. त्यामुळे सर्वकाही माझ्या देखरेखीखाली होऊ शकले. मी जेव्हा एखादी गोष्ट करण्याचे ठरविते तेव्हा त्याचा सारासार विचार करते. ‘टिकू वेड्स शेरू’च्या निर्मिती प्रक्रियेविषयी मी समाधानी आहे. अन्यथा तो माझा पहिला आणि शेवटचा चित्रपट असता निर्माती म्हणून.
तुम्ही स्वतः उत्तम अभिनेत्री आणि दिग्दर्शिका आहेत. तेव्हा अभिनय आणि दिग्दर्शन न करता फक्त निर्मिती का केली? कलाकार निवड कशी झाली?