कोल्हापूर भारतीय स्वातंत्र्याची ७५ वर्षे साजरी करत असताना इथे घडलेल्या सर्व क्षेत्रातील योगदानाची चर्चा करत असताना सिनेक्षेत्रातील एक घटना कधीही विसरता येणार नाही. ही अद्भूत गोष्ट आहे स्वतःचा कॅमेरा बनवून त्याच कॅमेऱ्याने सिनेमा बनवणाऱ्या कलामहर्षी बाबूराव पेंटर यांची. कोरीव काम, चित्रकला आणि मुर्तिकला यात पारंगत असलेल्या बाबूराव यांनी हा अचाट पराक्रम १०० वर्षापूर्वी भावाच्या मदतीने कोल्हापुरात केला होता.
बाबुराव पेंटर यांचा जन्म ३ जून १८९० या दिवशी कोल्हापूर येथे झाला. त्यांचे मूळ नाव बाबुराव कृष्णराव मेस्त्री असे होते. चित्रकला व शिल्पकला यांचे धडे त्यांना त्यांच्या वडिलांकडून मिळाले. सुरुवातीला ते तैलचित्रे काढत असत. गंधर्व नाटक कंपनीच्या रंगवलेल्या पडद्यांमुळे बाबूराव पेंटर यांची कलाक्षेत्रात एक वेगळी ओळख निर्माण झाली.
१९३० च्या सुमारास त्यांनी तयार केलेली सिनेमाची पोस्टर्स पाहून जे. जे. स्कूलचे तत्कालीन संचालक सालोमन यांनी त्यांचा सत्कार केला. जे. जे. स्कूलमध्ये काहीही शिक्षण घेतलेले नसतानादेखील रंगांच्या शुद्धतेविषयी व मिश्रणाविषयी बरीच माहिती त्यांना होती. चित्रकलेतील त्यांचे तंत्रकौशल्य म्हणजे रंगछटांचे वजन ते थोडेदेखील ढासळू देत नसत. त्यातूनच ते एक कल्पनारम्य, उत्कृष्ट अशी प्रतिमा निर्माण करत. त्यांनी तयार केलेल्या महात्मा गांधी, छत्रपती शिवाजी महाराज आणि महात्मा फुले यांच्या शिल्पकृती आजही कोल्हापूरमध्ये बघायला मिळतात. कलाक्षेत्रातील योगदानाबद्दल ‘कलामहर्षी’ या पदवीने गौरवण्यात आलेल्या बाबूराव पेंटर यांनी १९५४ मध्ये जगाचा निरोप घेतला.
कलामहर्षी बाबुराव पेंटरकोल्हापूर येथील बाबुराव पेंटर यांच्या वडिलांचा व्यवसाय सुतारकाम, लोहारकाम करणे हा होता. त्यामुळे त्यांना त्यांच्या वडिलांकडूनच शिल्पकला, चित्रकला या कलांचे ज्ञान मिळत गेले. या कामात आनंदराव पेंटर या त्यांच्या आतेभावाचीदेखील त्यांना सोबत मिळाली. चित्रकला, शिल्पकला, चित्रपट अशा तीनही कलांमध्ये त्यांनी स्वतःचे असामान्य कौशल्य सिद्ध कले. शिल्पकलेच्या कामासाठी त्यांनी स्वतःची फॅक्टरी देखील सुरू केली होती. शिल्पकलेतील मातीचे असो वा धातूचे ओतकाम असो, बाबुराव स्वतः ही कामे करत.
स्वतः प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा तयार करणारे पहिले भारतीय आनंदराव व बाबुराव पेंटर हे दोघे बंधू कोल्हापूरचे अष्टपैलू कलाकार. आनंदरावांच्या मृत्यूनंतर बाबुराव पेंटर यांनी जिद्द व परिश्रमाने स्वतः प्रोजेक्टर व स्वदेशी कॅमेरा तयार केला. त्याचबरोबर छपाई यंत्र, डेव्हलपिंग स्पिडोमीटरही तयार केला. दि. १ डिसेंबर १९१८ साली त्यांनी महाराष्ट्र फिल्म कंपनीची स्थापना केली.