मुंबई Junior Mehmood and Johny lever :ब्रह्मचारी फेम अभिनेता ज्युनियर मेहमूद सध्या जीवन आणि मृत्यूची लढाई लढत आहे. तो कॅन्सरच्या चौथ्या स्टेजमध्ये आहे. ज्युनियर मेहमूद हा गेल्या दोन महिन्यांपासून आजारी होता. यादम्यान त्याचं वजन अचानक कमी होऊ लागलं, यानंतर त्यानं टेस्ट केली. नोव्हेंबरमध्येच त्याच्या आजारचं निदान झालं. त्याच्या आजाराबद्दल जवळचा मित्र सलाम काझीनं माहिती दिली. सलाम यानं एका मुलाखती दरम्यान सांगितलं की, 'तो 2 महिन्यांपासून आजारी होता आणि सुरुवातीला आम्हाला वाटलं की, काही किरकोळ समस्या असेल पण त्यानंतर अचानक त्याचं वजन कमी होऊ लागलं आणि जेव्हा वैद्यकीय अहवाल समोर आला, तेव्हा त्याला कर्करोग असल्याचं सांगण्यात आलं. मेहमूदच्या यकृत आणि फुफ्फुसच्या आतड्यात गाठ आहे आणि त्याला कावीळ देखील झाली आहे. आता यावर उपचार सुरू आहेत. ही स्टेज चौथी असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं आहे'.
डॉक्टरांनी 40 दिवसांचा वेळ दिला :याशिवाय सलाम काझीनं पुढं म्हटलं, मेहमूदच्या फुफ्फुसात आणि शरीरात कर्करोग पसरला आहे. डॉक्टरांनी त्याला 40 दिवसांची मुदत दिली आहे. सध्या मेहमूद हा घरीच उपचार घेत आहे. दरम्यान ज्युनियर मेहमूदचा चांगला मित्र असलेला अभिनेता जॉनी लीव्हर नुकताच त्याला भेटायला गेला होता. यावेळी त्यानं मेहमूदच्या प्रकृतीची विचारपूस केली. याशिवाय त्यांच्या भेटीचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. व्हायरल व्हिडिओमध्ये मेहमूद बेडवर झोपलेला दिसत आहे. याशिवाय तो खूपच अशक्त झाला आहे. यावेळी जॉनी लीव्हर हा प्रोत्साहन देताना दिसत आहे.