छत्रपती शिवाजी महाराज यांनी स्वराज्य आणि सुराज्य आणले त्याच्यापाठी होत्या जिजामाता. शिवाजी महाराजांच्या जीवनावर आणि इतर अनेक प्रमुख घटनांवर आधारित अनेक चित्रपट बनले आहेत. परंतु जीजामातांवर फारच कमी चित्रपट बनलेत. ती कसर भरून काढण्यासाठी दिग्दर्शक प्रितम एस के पाटील जिजाऊंचा इतिहास 'स्वराज्य कनिका - जिऊ' या चित्रपटांमधून पडद्यावर आणत आहेत. जिजाबाईंच्या ४२५व्या जयंतीचे औचित्य साधत नुकतेच या चित्रपटाचे पोस्टर रसिक प्रेक्षकांच्या भेटीस आले आहे.
मुजरा माझा त्या माँ जिजाऊला,
घडविले तिने त्या शूर शिवबाला!!
छत्रपती शिवाजी महाराजांच्या मातोश्री जिजाबाई. स्वराज्याचा रक्षक ज्यांनी जन्माला घातला. त्याच्या अंगी स्वराज्य रक्षणाचे बाळकडु पाजून त्यांना सक्षम करण्यात राजमाता जिजाऊंचे अतुल्य योगदान हा महाराष्ट्र कधीही विसरणार नाही. कुशाग्र बुद्धिमत्ता, चातुर्य, पराक्रम, कुशल राजनीती, संघटनशक्ती आणि कुटुंबवत्सल जिजाऊ केवळ शिवरायांच्याच नाही तर संपूर्ण स्वराज्याच्या माता होत्या. प्रसंगी कठोर होऊन शत्रूस जेरीस आणणाऱ्या या स्वराज्य कनिकेच्या कर्तुत्वाला हजारो-लाखो तोफांची सलामी दिली तरी कमीच आहे. शिवरायांच्या संगोपनात तसूभरही कसर न सोडणाऱ्या 'जिजाऊ' कशा होत्या या बद्दलची माहिती तशी कमीच पण त्यांचं कार्य जगासमोर आलं पाहिजे, खरंतर ती काळाची गरजच आहे. स्त्री अबला नसून सबला आहे, असे दाखवून देणाऱ्या या व्यक्तिमत्त्वावर चित्रपट नसता आला तरच नवल. नेमकी हीच बाब हेरत '६ फायरफ्लाईज प्रॉडक्शन्स' प्रस्तुत अनुजा देशपांडे निर्मित आणि प्रितम एस.के. पाटील लिखित-दिगदर्शित 'स्वराज्य कनिका -जिऊ' हा मराठी चित्रपट लवकरच डोळ्यांचे पारणे फेडण्यास सज्ज होणार आहे.