मुंबई- बॉलिवूड दिग्दर्शक करण मल्होत्रा याने अभिनेता रणबीर कपूर अभिनीत 'शमशेरा' चित्रपटाचे नवीन गाणे 'जी हुजूर' रिलीज करण्याची घोषणा करताना 'नाचण्यास तयार आहेत का' असा प्रश्न प्रेक्षकांना विचारला आहे. "तुम्ही नाचायला तयार आहात का?" असे इंस्टाग्रामवर दिग्दर्शकाने कॅप्शन दिले आहे.
2 मिनिटांच्या 16 सेकंदाच्या व्हिडिओमध्ये रणबीर बल्ली या पात्राच्या रफ आणि टफ भूमिकेत दिसत आहे. तो वाळवंटी प्रदेशातील आणि मातीची घरे असलेल्या गावात 'जी हुजूर' च्या तालावर नाचत मुलांसोबत धमाल करत असल्याचे दिसत आहे. रणबीरचा अडाणी अवतार, पठाण सूट घातलेला, विस्कटलेले केस आणि लाल रंगाचा बंडाना त्याला खूप अनुकूल वाटत आहे. बल्लीवर प्रेम करणाऱ्या मुलांनी त्याला घेरले आहे. रणबीरच्या दमदार डान्स मूव्ह आणि त्याचे विलक्षण एक्सप्रेशन हे गाण्यात एक अतिरिक्त बोनस असल्याचे पाहायला मिळत आहे. 'जी हुजूर' हे गाणे आदित्य नारायण यांनी गायले आहे तर गायक शादाब फरीदी यांनी गाण्यात साथ दिली आहे.
'शमशेरा'मध्ये रणबीर त्याची पहिली दुहेरी भूमिका साकारणार आहे. अधिकृत ट्रेलरनुसार, दुहेरी भूमिकांपैकी रणबीरचे एक पात्र अतिशय तीव्र आहे. या भूमिकेतील रणबीर कपूरने पूर्ण वाढलेली दाढी आणि लांब, केस ठेवले आहेत. तर दुसरे एक मजेदार पात्र आहे. करण मल्होत्रा दिग्दर्शित, 'शमशेरा'चा अधिकृत ट्रेलर 24 जून रोजी प्रदर्शित झाला. ट्रेलरनुसार, हा चित्रपट काजा या काल्पनिक शहरात बेतलेला असून रणबीर आपल्या जमातीला वाचवण्यासाठी गुलामांचा नेता बनतो.
'शमशेरा' मध्ये संजय दत्त देखील मुख्य भूमिकेत आहे. दरोगा शुद्ध सिंह या खलनायकाच्या भूमिकेत तो दिसणार आहे. रणबीर कपूर आणि संजय दत्त व्यतिरिक्त, 'बेफिक्रे' अभिनेत्री वाणी कपूर देखील या चित्रपटात रणबीरच्या प्रेयसीच्या भूमिकेत आहे. 'शमशेरा'मध्ये आशुतोष राणा, सौरभ शुक्ला, रोनित रॉय आणि त्रिधा हे कलाकारही आहेत. आदित्य चोप्रा निर्मित 'शमशेरा' 22 जुलै रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार आहे.
हेही वाचा -अभिनेत्री मीना यांचे पती विद्यासागर यांचे वयाच्या ४८ व्या वर्षी निधन