मुंबई - Vinayakan : रजनीकांत स्टारर 'जेलर'मध्ये खलनायक वर्मनच्या भूमिकेत दिसलेल्या विनायकनला अटक करण्यात आली होती. विनायकननं एर्नाकुलम टाऊन नॉर्थ पोलिस स्टेशनमध्ये मद्यधुंद अवस्थेत गोंधळ घातल्याचे बोलले जात आहे. त्यानंतर केरळ पोलिसांनी विनायकनला अटक केली. मिळालेल्या माहितीनुसार असं सांगण्यात येत आहे की, विनायकननं त्याच्या अपार्टमेंटमध्ये गोंधळ घातला होता, त्यानंतर पोलिसांनी त्याला पोलिस ठाण्यात बोलावले. जेव्हा विनायकन पोलीस ठाण्यात पोहोचला, तेव्हा तो दारूच्या नशेत होता. त्यांनी तेथे देखील गोंधळ सुरू केला, त्यानंतर पोलिसांनी त्याला अटक केली.
'जेलर' फेम विनायकनची झाली सुटका : याप्रकरणी पोलीस अधिकाऱ्यानं सांगितले की, विनायकनच्या कलूर येथील फ्लॅटवर पोहोचून कौटुंबिक समस्येशी संबंधित तक्रारीवरून तपास करण्यात आला. त्यावेळी त्यानं अधिकाऱ्यांशी गैरवर्तन केले. त्यानंतर त्याच्याशी चर्चा करून पोलीस परतले. विनायकनला पुन्हा पोलीस ठाण्यात बोलावलं, मात्र त्यानं याबद्दल गांभीर्यानं घेतलं नाही. विनायकननं एर्नाकुलम नॉर्थ स्टेशन गाठून पोलिसांशी वाद घातला. त्यानं केलेल्या गोंधळामुळं पोलिस स्टेशनचे नियमित कामकाज विस्कळीत झाले, त्यामुळे त्याला अटक करण्यात आली. पोलिसांनी विनायकनला एर्नाकुलम जनरल हॉस्पिटलमध्ये नेले आणि त्याची वैद्यकीय तपासणी केली. विनायकननं जेव्हा पत्रकारांशी संवाद साधला. विनायकननं पत्रकारांशी बोलताना सांगितले, तो तक्रार दाखल करण्यासाठी आला होता आणि त्यानंतर त्याला अटक करण्यात आली होती. त्यानंतर मला हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले याबद्दल तुम्ही पोलिसांना विचारू शकता. दरम्यान आता विनायकनची जामिनावर सुटका झाली आहे.