मुंबई Ira Khan and Nupur Shikhare Wedding : अभिनेता आमिर खानची मुलगी आयरा खान आज 3 जानेवारीला लग्न करणार आहे. आमिर खानचं घर पूर्णपणे सजलं आहे. आयरा आणि नुपूर शिखरेचे प्री-वेडिंग फंक्शन्स 2 जानेवारीपासून सुरू झाले आणि आज या जोडप्याचं कोर्ट मॅरेज होणार आहे. त्यानंतर हे जोडपे 8 जानेवारीला राजस्थानमधील उदयपूरमध्ये महाराष्ट्रीय रितीरिवाजांनुसार लग्नबंधनात अडकणार आहेत. या जोडप्याच्या लग्नाचे विधी सध्या सुरू आहेत. काल आमिर खानच्या लाडक्या मुलीचा हळदीचा समारंभ पार पडला. आज आयराच्या हातावर मेहंदी लावली जाणार आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरेचं लग्न शाही थाटात होणार असल्याचं समजत आहे.
आयरा खान आणि नुपूर शिखरेचं लग्न :आमिर खानची बहीण निखत खान हेगडेनं लग्नसोहळ्यासंदर्भात काही माहिती शेअर केली आहे. प्रसारमाध्यमांशी संवाद साधताना निकतनं सांगितलं की, आयरा खान आणि नुपूर शिखरे यांच्या संगीत समारंभासाठी कुटुंबानं एकत्र नृत्याचा सराव केला आहे. याशिवाय आयराची आई रीना दत्ताचे कुटुंब दिल्ली आणि पंजाबमधून मुंबईला आले आहे. आयरा खान आणि नुपूर शिखरे आज मुंबईतील ताज लँड्स एंड येथे अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत दुपारी 2 ते 4 या वेळेत लग्नाची नोंदणी करणार आहे. यानंतर ताज लँड्स एंड येथे भव्य रिसेप्शन होईल, ज्यात फक्त मित्र आणि कुटुंबातील सदस्य उपस्थित राहणार आहेत.