मुंबई- सिनेमॅटोग्राफर, पटकथालेखक आणि दिग्दर्शक प्रवीण भट यांनी दिग्दर्शक महेश भट्ट सोबत भरपूर काम केलंय. आणि त्यांचा मुलगा विक्रम भट यानेसुद्धा महेश भट सोबत ‘राझ’च्या फ्रँचायझी वर काम केले आहे. आता विक्रम भट दिग्दर्शित ‘जुदा होगे भी’ नुकताच प्रदर्शित झालाय आणि त्यांनी आमचे प्रतिनिधी कीर्तिकुमार कदम सोबत खास संवाद साधला. या चित्रपटाच्या संकल्पनेमागे कोणाचा हात होता या प्रश्नाला उत्तर देताना विक्रम भट म्हणाले की, “आम्ही ‘कोड’ नावाच्या चित्रपटावर काम करीत होतो. त्याचे चारेक दिवसांचे चित्रीकरणही झाले होते. त्याचसुमारास मी आजारी पडलो आणि मला बरेच दिवस इस्पितळात रहावे लागले. त्यावेळी मला जाणवले की तो चित्रपट बनवू नये. मी माझ्या ‘बॉस’ (विक्रम महेश भट ना ‘बॉस’ म्हणून संबोधितात) ला तसे सांगितले आणि त्यांनीही आक्षेप घेतला नाही. मला काहीतरी ‘इंटेन्स’ बनायचे होते आणि मी महेश सरांना विनंती केली की तुम्ही एखादी कथा लिहा. परंतु त्यांनी नकार दिला हे कारण देत की ‘तू हॉरर चित्रपट बनवितोस आणि मी प्रेम कथा’. मी त्यांना सांगितले की तुम्ही लव्हस्टोरी लिहा आणि मी त्यात हॉरर टाकेन. आणि त्यांनी ‘जुदा होगे भी’ ची कथा लिहिली.”
विक्रम भट पुढे म्हणाले की, “खरंतर या चित्रपटात ‘वशीकरण’ चा वापर केलेला दर्शविण्यात आले आहे. किंबहुना यातील खलनायक त्याचा वापर करून चित्रपटाच्या नायिकेला वश करू पाहतोय. माझ्या एका मैत्रिणीचा ब्रेक अप होत होता परंतु तिचा प्रियकर तिला सोडायला तयार नव्हता. तिच्या मते तो तिच्यावर काळ्या जादूचा प्रयोग करीत होता. या आधुनिक काळात यावर विश्वास ठेवणे कठीण आहे. परंतु तरीही आम्ही एका तांत्रिकाला भेटलो आणि त्याने त्याच्या पद्धतीने तिची ‘सुटका’ केली. त्याच्याकडून या विषयावरची बरीच माहिती मिळाली ज्याचा चित्रपटात वापर करून घेतलाय. त्याने असेही सांगितले की त्याच्याकडे वशीकरण करून घेण्यासाठी अनेक जण येतात आणि ९०% तरुण प्रेम आणि सेक्स साठी याचा वापर करून घेत असतात. ‘जुदा होगे भी’ मधील व्हिलन वशीकरणाच्या मदतीने हिरॉईन च्या मेंदूवर नियंत्रण मिळवितो आणि तिला आपल्याला हवे तसे वागायला सक्ती करतो.”