मुंबई - प्रत्येक चित्रपट बनत असताना अनेक किस्से घडत असतात. सातारचा सलमानच्या चित्रिकरणावेळीदेखील एक 'रंगीबेरंगी' किस्सा घडला. 'सातारचा सलमान' हा चित्रपट लवकरच प्रदर्शित होणार आहे. त्याचे दिग्दर्शक हेमंत ढोमे यांनी एका गाण्याच्या चित्रीकरणासाठी संपूर्ण गावाला रंगवून काढल्याची अनोखी गोष्ट घडली आहे. या रंगरंगोटी विषयी सांगताना ते म्हणाले की, 'सातारचा सलमान' या चित्रपटात एक धमाल गाणे आहे जे सुयोग गोऱ्हे, सायली संजीव, शिवानी सुर्वे, अक्षय टांकसाळे, यांच्यावर चित्रीत करण्यात आले आहे. अत्यंत जोषपूर्ण असलेल्या या गाण्यात एकंदरच रंगीबेरंगी वातावरण, आजूबाजूला पारंपरिक पोशाखात जल्लोषात नाचणारे गावकरी, सुयोगचा उत्स्फूर्त नाच आणि त्याला इतर कलाकारांनी दिलेली उत्तम साथ एकंदरच सगळं मस्त जुळून आले आहे. परंतु हे करण्यासाठी खूप कष्ट घ्यावे लागले.'
त्यांचं झालं असं की हेमंत ढोमे यांच्या डोक्यात हे गाणे चित्रित करण्यापूर्वी काही कल्पना रुंजत होत्या. हे गाणे सिनेमाचा हायलाईट ठरू शकत असल्यामुळे ढोमेंना बॅकग्राऊंड रंगीबेरंगी हवी होती. आता गावाकडल्या घरांना तशी आकर्षकता असण्याची शक्यताच नव्हती. त्यामुळे मग असे ठरले गेले की गाण्यात रंगीबेरंगीपणा आणण्यासाठी तेथील घरे सुद्धा रंगीबेरंगी असावीत. मग प्रॉडक्शन च्या खर्चाने तेथील घरांना रंग देण्याचे ठरले. परंतु या गोष्टीसाठी गावकऱ्यांना तयार करणे आवश्यक होते. ते याला तयार होतील की नाही ही शंका होती.