मुंबई : सनी देओल आणि अमिषा पटेल स्टारर हिंदी चित्रपट 'गदर २' सध्या खूप चर्चेत आहे. हा चित्रपट लवकरच रूपेरी पडद्यावर प्रदर्शित होईल. दरम्यान आता या चित्रपटामधील एक गाणे रिलीज झाले आहे. या गाण्याचे बोल 'खैरियत' हे असून या गाण्याला अरिजित सिंग आणि मिथुन यांनी गायले आहे तर गाण्याचे बोल सईद कादरी यांनी लिहिले आहेत. याशिवाय या गाण्यला संगीत हे मिथून यांनी संगीत दिले आहे. हे गाणे प्रेक्षक खूप पसंत करत आहेत. या गाण्यामध्ये सनी देओल (तारा सिंग) उत्कर्ष शर्मा (चरणजीत सिंग) आणि अमिशा पटेल (सकीना) हे कलाकार दाखविण्यात आले आहेत.
'गदर २' गाणे रिलीज : चित्रपटाच्या नवीन गाण्याच्या सुरुवातीला सनी देओल एका ट्रकमधून डोंगर आणि नद्या पार करताना एक पत्र वाचताना दाखवण्यात आले आहे, ज्यामध्ये त्याच्या कुटुंबाची झलक पाहायला मिळते. तारा सिंग आपल्या मुलाची आठवण करून भावूक होतो. आपला मुलगा घरी परतावा यासाठी प्रार्थना करताना सकीना (अमिशा पटेल) भावूक होताना दिसत आहे. दुसरीकडे, त्याचा मुलगा उत्कर्ष (चरणजीत), जो आता मोठा झाला आहे, त्याला त्याच्या कुटुंबासोबत घालवलेले आनंदाचे क्षण आठवतांना दिसत आहे. चरणजीत त्याच्या कुटुंबापासून कसा वेगळा झाला हे सध्या तरी सांगण्यात आलेले नाही. प्रवासादरम्यान सनी प्रत्येक देवाकडे प्रार्थना करतो की आपला मुलगा सुखरूप राहो. संपूर्ण गाण्यादरम्यान हे तिघेही भावूक होताना दिसत आहेत. या गाण्यात ते त्यांचा जुना काळ आठवून प्रार्थना करताना दिसतात. या गाण्याला युट्यूबवर अवघ्या एका तासात ६ लाखांहून अधिक व्ह्यूज मिळाले आहेत.
'गदर २' आणि 'ओ माय गॉड २' भिडणार रूपेरी पडद्यावर : तारा आणि सकीना यांची देशभक्तीवर असलेल्या या प्रेमकथाने २००१ मध्ये अनेक विक्रम मोडले. आता निर्माते चित्रपटाच्या दुसऱ्या भागासह प्रेक्षकांचे मनोरंजन करण्यासाठी सज्ज झाले आहेत. ११ ऑगस्टला 'गदर २'ची टक्कर अक्षय कुमारच्या 'ओ माय गॉड २'शी होणार आहे. त्यामुळे कुठला चित्रपट बॉक्स ऑफिसवर किती कमाई करेल हे बघणे लक्षणीय ठरणार आहे.