नवी दिल्ली:पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाजप कार्यकर्त्यांना चित्रपटांबद्दल "अनावश्यक" टिप्पणी करण्यापासून दूर राहण्यास सांगितले आहे. दोन दिवसीय राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीच्या शेवटच्या दिवशी मंगळवारी कार्यकर्त्यांसमोर मार्गदर्शन करताना त्यांनी हे वक्तव्य केले.
राम कदम आणि नरोत्तम मिश्रा यांसारख्या अनेक भाजप नेत्यांनी बेशरम रंग या गाण्यात दीपिका पदुकोणच्या भगव्या पोशाखावरून निर्मात्यांवर टीका केल्यानंतर व शाहरुख खानच्या पठाण चित्रपटाच्या विरोधात तयार झालेल्या वातावरणाच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधानांनी हे विधान केले. पठाण चित्रपटातील बेशरम रंग हे गाणे दीपिकाने परिधान केलेल्या भगव्या रंगाच्या बिकिनीमुळे चर्चेत आले आणि यातील काही सीन्सही राजकीय नेत्यांना आक्षेपार्ह वाटले.
या गाण्यातील भगव्या रंगाची बिकनी आणि गाण्याचे बोल यामुळे हिंदूंच्या भावना दुखावल्या गेल्याचा दावा करत चित्रपट निर्मात्यांवर व कलाकारांवर टीका सुरु झाली. यानंतर पुढे जाऊन सोशल मीडियावर बायकॉट पठाण व त्याही पुढे जाऊन बॉलिवूड बहिष्काराची भूमिका उजव्या विचारसरणीच्या गटाकडून घेण्यात येऊ लागली.
पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पक्ष कार्यकर्त्यांना दिलेल्या सूचना सुनील शेट्टी यांनी उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांना इंडस्ट्रीला बॉयकॉट बॉलीवूडच्या ट्रेंडपासून मुक्त करण्यात मदत करण्याच्या विनंतीचा परिणाम म्हणूनही पाहिले जाते. या महिन्याच्या सुरुवातीला जेव्हा सुनिल शेट्टी याने योगी यांची मुंबईत भेट घेतली तेव्हा त्यांनी काही तक्रारी मुख्यमंत्र्यांसमोर मांडल्या होत्या.
सुनीलने योगी आदित्यनाथ यांना केलेल्या विनंतीत म्हटले होते की, हॅशटॅग बॉयकॉटबॉलीवूड तुम्ही थांबवू शकता, तुम्ही पुढाकार घ्या आणि याबाबत पंतप्रधानांचीही मदत घ्या. "आम्ही चांगले काम केले आहे हे सांगणे महत्त्वाचे आहे. एक सडलेले सफरचंद असू शकते परंतु आपल्यापैकी 99 टक्के लोक कोणत्याही चुकीच्या कामात गुंतत नाहीत. आम्हाला ही धारणा बदलली पाहिजे. जर तुम्ही पुढाकार घ्याल आणि पंतप्रधानांशी बोलाल तर, फरक पडेल," असे सुनील शेट्टी म्हणाला होता. योगी आदित्यनाथ यांनी बॉलिवूडमधील अनेक निर्माते, तंत्रज्ञ आणि कलाकार भेटले होते. बॉलिवूडवर आलेले संकट दूर करण्यासाठी प्रत्येकाने आपल्या परीने प्रयत्न केला होता.
अभिनेता सुशांत सिंग राजपूतच्या निधनानंतर बॉयकॉट बॉलिवूड हा हॅशटॅग ट्रेंडमध्ये येऊ लागला. तथापि, 2022 मध्ये, लाल सिंग चड्ढा, लायगर, ब्रह्मास्त्र आणि रक्षाबंधन यांसारख्या अनेक चित्रपटांच्या रिलीजपूर्वी नेटिझन्सनी ट्रेंड पुन्हा सुरू केला. या ट्रेंडचा परिणाम काही चित्रपटांच्या बॉक्स ऑफिस व्यवसायावर झाला होता.
हेही वाचा -शाहरुख खानदानसाठी पठाण स्पेशल स्क्रीनिंगचे आयोजन, सुहाना, आर्यनसोबतचे फोटो व्हायरल