नवी दिल्ली - Dussehra 2023: सालाबाद प्रमाणे ऐतिहासिक लाल किल्ल्यावर दिल्लीच्या सर्वात मोठ्या रामलीलाचं आयोजन केलं जात. अनेक सेलेब्रिटी, व्हीआयपी आणि राजकारण्यांची यासाठी उपस्थिती असते. यंदा पहिल्यांदाच रावण दहनाचा मान महिलेला देण्याचा निर्णय रामलीला समितीच्या आयोजकांनी घेतला होता. त्यानुसार अभिनेत्री कंगना रणौत प्रमुख पाहुणी म्हणून उपस्थित होती. तिच्या हस्ते रावण दहनाचा सोहळा अतिशय उत्साहात पार पडला.
लव कुश रामलीला समितीने आयोजित केलेल्या या उत्सवासाठी अभिनेत्री कंगना रणौत हिच्या शिवाय दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि नायब राज्यपाल व्हीके सक्सेना देखील उपस्थित होते. या सोहळ्यासाठी कंगनानं पारंपरिक साडी नेसली होती. भरजरी साडीसह दागिने आणि मेकसह सजलेली कंगना खूपच सुंदर दिसत होती. या कार्यक्रमात कंगनानं ‘जय श्री राम’चा जयघोषही केला.
सोमवारी कंगनानं जाहीर केलं होतं की, दिल्लीतील प्रसिद्ध लव कुश रामलीला समितीनं आयोजित केलेल्या लाल किल्ला मैदानावर रावणाच्या पुतळ्याचे दहन करणारी ती पहिली महिला असणार आहे. कंगनानं इन्स्टाग्रामवर एक व्हिडिओ शेअर करुन ही माहिती चाहत्यांना दिली होती. यात तिनं सांगितलं होतं की, लाल किल्ल्यावर दरवर्षी होणाऱ्या कार्यक्रमाच्या ५० वर्षांच्या इतिहासात यंदाची पहिलीच वेळ असेल जेव्हा एखादी महिला रावणाच्या पुतळ्याला दहन करेल.