मुंबई - SRK Dunki Movie : शाहरुख खान स्टारर 'डंकी' आज चित्रपटगृहांमध्ये दाखल झाला आहे. या चित्रपटाची वाट चाहते अनेक दिवसांपासून पाहत होते. आता चाहत्यांची प्रतीक्षा संपली आहे. आता प्रेक्षकांना शाहरुखचा नवा अवतार पडद्यावर पाहायला मिळणार आहे. देशांतर्गत या चित्रपटाचा पहिला शो मुंबईतील गेइटी, गॅलेक्सी या सिंगल-स्क्रीन थिएटर्समध्ये पहाटे 5.55 वाजता प्रदर्शित झाला. आजचा दिवस 'किंग खान'च्या चाहत्यांसाठी खूप महत्त्वाचा आहे. शाहरुखचे चाहते 'डंकी'च्या प्रदर्शनानिमित्त ठिकठिकाणी जल्लोष करताना दिसतायत. सध्या त्यांचे काही व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत, ज्यात अनेकजण सेलिब्रेशन करताना दिसत आहेत.
शाहरुखनं शेअर केली पोस्ट :शाहरुखच्या फॅन क्लबनं चाहत्यांच्या सेलिब्रेशनचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. यामध्ये लोकांचा मोठा जमाव ढोल-ताशांच्या तालावर नाचताना आणि 'डंकी'च्या रिलीज झाल्याचा आनंद साजरा करत असताना फटाके उडवताना दिसतो. या चित्रपटासाठी चाहत्यांचं प्रेम आणि उत्साह पाहून शाहरुख स्वाभाविकपणे खूप खुश आहे. त्यानं 'एक्स'वर एक व्हिडिओ पोस्ट करत लिहिलं, ''धन्यवाद मित्रांनो, मला आशा आहे की, 'डंकी' तुम्हा सर्वांचं मनोरंजन करेल.'' या पोस्टवर अनेकजण कमेंटस् करून शाहरुखवर प्रेमाचा वर्षाव करत आहेत. दरम्यान, अनेकदा 'किंग खान' मजेदार आणि मनोरंजक कमेंटस् करून चाहत्यांना खुश करत असतो. त्यानं 'एक्स'वर 'डंकी' सेलिब्रेशनच्या व्हिडिओवर रिपोस्ट करत लिहिलं, 'अरे आता चित्रपट पाहायला जा, नाहीतर बाहेर कुस्ती खेळत राहा. 'डंकी' चित्रपट पाहा आणि तुम्हा सर्वांना आवडला असेल तर मला कळवा.''