मुंबई : आयुष्मान खुराना आणि नुसरत भरुचा या जोडीने 'ड्रीम गर्ल'मध्ये आपल्या दमदार अभिनयाने प्रेक्षकांची मने जिंकली होती. दोघांची केमिस्ट्री चाहत्यांना खूप आवडली होती आणि हा चित्रपट २०१९ चा हिट चित्रपट होता. दरम्यान याचा पुढचा भाग 'ड्रीम गर्ल २' लवकरच रिलीज होणार आहे. पण सीक्वेलमध्ये नुसरतची जागा अभिनेत्री अनन्या पांडेने घेतली आहे. नुसरत भरुचाने आता 'ड्रीम गर्ल २' या चित्रपटाबद्दल एक खुलासा केला आहे. 'ड्रीम गर्ल २'मध्ये तिला न घेतल्याने तिचे मन दुखावले गेले आहे. याशिवाय तिने 'ड्रीम गर्ल' चित्रपटामधील तिच्या जुन्या आठवणी शेअर केल्या आहेत.
ड्रीम गर्ल २ मधून वगळल्यानंतर नुसरत भरुचाने तोडले मौन :नुसरत भरुचा 'ड्रीम गर्ल २'चा भाग नाही. तिने आता यावर प्रतिक्रिया दिली आहे. या चित्रपटाबाबत बोलताना तिने म्हटले आहे की, 'मी 'ड्रीम गर्ल'चा एक भाग होते आणि मला संपूर्ण टीम आवडते. मी त्यांच्यासोबत काम करतानाचे दिवस खूप मिस करते. पण त्यांनी मला 'ड्रीम गर्ल २'मध्ये का कास्ट केले नाही, या प्रश्नाचे उत्तर ते देऊ शकले नाहीत. मला माहीत नाही या गोष्टीचा काय तर्क आहे, याचे उत्तर माझ्याकडे नाही. मला या चित्रपटात का कास्ट केले नाही हे मला समजले नाही. मी देखील एक माणूस आहे, मला कळवले नाही याचे दु:ख मला देखील झाले आहे. हे अन्यायकारक आहे. पण हा त्यांचा निर्णय आहे. छान, हरकत नाही.' असे तिने यादरम्यान म्हटले.