मुंबई - Sanjay Gadhvi Passed Away: 'धूम' आणि 'धूम 2' यासारख्या सुपरहिट चित्रपटांचे दिग्दर्शक संजय गढवी यांचे आज (रविवार, १९ नोव्हेंबर रोजी) निधन झाले. ५७ व्या वर्षी संजय यांनी सकाळी दहाच्या सुमारास अखेरचा श्वास घेतला. मिळालेल्या माहितीनुसार, ते सकाळी लोखंडवाला बॅकरोड येथे फिरायला जात असताना अचानक त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यानंतर त्यांना घाम आला. त्यानंतर संजय गढवी यांना तातडीनं कोकिलाबेन रुग्णालयात नेण्यात आले, तेथे डॉक्टरांनी संजय यांना मृत घोषित केले. संजय यांच्या निधनानं चित्रपटसृष्टीत शोककळा पसरली आहे. त्याच्या अशा अचानक जाण्यामुळं बॉलीवूडचे मोठे नुकसान झाले आहे. सध्या दिग्दर्शक संजय यांचे पार्थिव शरीर कोकिलाबेन रुग्णालयात आहे. आज संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होणार आहेत.
संजय गढवी यांच निधन : मिळालेल्या माहितीनुसार, संजय गढवी यांना मॉर्निंग वॉक दरम्यान हृदयविकाराचा झटका आला, ते ज्या ठिकाणी फिरायला गेले होते तेथून कोकिलाबेन अंबानी हॉस्पिटलचे अंतर फक्त एक ते दीड किलोमीटर होते. त्यांच्या निधनानंतर अनेक सेलेब्रिटी सोशल मीडियावर शोक व्यक्त करत पोस्ट करत आहेत. यशराज फिल्म्स त्यांच्या एक्सवर लिहलं, ''पडद्यावर निर्माण केलेली जादू कायमच जपली जाईल. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो' त्यानंतर चित्रपट विश्लेषक तरण आदर्श यांनी देखील एक्सवर लिहलं, ''हे हृदयद्रावक आहे. 'धूम' आणि 'धूम 2'चे दिग्दर्शक संजय गढवी यांच्या निधनाबद्दल ऐकून धक्का बसला, दु:ख झाले कुटुंबियांप्रती शोक व्यक्त करतो... ओम शांती'' त्यानंतर दिग्दर्शक कुणाल कोहली यांनी एक्सवर लिहलं, 'हे धक्कादायक आहे. संजय गढवी यांना श्रद्धांजली मला तुमचा मृत्युलेख लिहावा लागेल असे कधीच वाटले नव्हते. तुझी आठवण येईल मित्रा. हे स्वीकारणे खूप कठीण आहे''. अनेक सेलेब्रिटी त्यांना श्रद्धांजली वाहत आहेत.