मुंबई - बॉलिवूड अभिनेता वरुण धवन आणि सिकंदर खेर सध्या सर्बियामध्ये सिटाडेल या वेब सिरीजसाठी शूटिंग करत आहेत. यासाठी त्यांनी प्रचंड मेहनीतीने अॅक्शनचे प्रशिक्षण घेतले आहे. 'या वेब मालिकेत अतिशय तीव्र अॅक्शन असणार आहे आणि ही एक गुप्तचर मालिका असल्याने हालचाली आणि लढाईच्या सिक्वेन्समध्ये एक विशिष्ट वेग असणे आवश्यक आहे, ज्यासाठी सध्या प्रशिक्षण देणे सुरू आहे. मालिकेसाठी जुलैपर्यंत शूटिंग सुरू राहणार आहे', असे सिटाडेल मालिकेच्या निर्मितीशी संबंधीत सूत्राने सांगितले.
या शोबद्दल बोलताना, समंथा आधी म्हणाली होती की, 'जेव्हा प्राइम व्हिडिओ आणि राज आणि डीके यांनी या प्रकल्पासाठी माझ्याशी संपर्क साधला, तेव्हा मी मनापासून ते हाती घेण्याचा निर्णय घेतला होता! द फॅमिली मॅनवर या टीमसोबत काम केल्यानंतर, माझ्यासाठी ही घरवापसी आहे. सिटाडेल विश्व, जगभरातील प्रॉडक्शन्समधील परस्परसंबंधित कथानक आणि सर्वात महत्त्वाचे म्हणजे, भारतीय भागाच्या स्क्रिप्टने मला खरोखर प्रोत्साहित केले. रुसो ब्रदर्सच्या एजीबीओद्वारे संकल्पित केलेल्या या तेजस्वी विश्वाचा एक भाग म्हणून मी खूप उत्साहित आहे. अभिनेता वरुण ग्रोव्हरसोबत या प्रोजेक्टवर पहिल्यांदाच काम करण्यास उत्सुक आहे. तो जीवनात अतिशय उत्साहित असून तो तुमच्या आजूबाजूला असताना वातावरणात आनंद भरवून टाकतो.'
राज आणि डीके दिग्दर्शित सिटाडेल ही स्पाय थ्रिलर वेब सिरीजमध्ये, समंथा रुथ प्रभू देखील महत्त्वपूर्ण भूमिकेत आहे. हा शो रुसो ब्रदर्सच्या त्याच नावाच्या मालिकेचे भारतीय रूपांतर आहे. अभिनेत्री प्रियांका चोप्रा आणि रिचर्ड मॅडन हे आंतरराष्ट्रीय मूळ आवृत्तीचे मुख्य कलाकार आहेत. सिटाडेलच्या भारतीय आवृत्तीच्या प्रसारण तारखेची अद्याप प्रतीक्षा लागून राहिली आहे. भारतीय सिटाडेल आवृत्ती अधिकाधिक इथल्या वैशिष्ठ्यांसह व भाषा व संस्कतीच्या लहेजासह निर्मित केली जात आहे. राज आणि डीके हे या क्षेत्रातील नामवंत दिग्दर्शक मानले जातात. फॅमिली मॅन या मालिकेतील त्यांच्या दिग्दर्शनाने या विश्वाबद्दलची कमालीची उत्सुकता निर्माण करण्यात त्यांना यश मिळाले होते.