मुंबई- फर्जी या जबरदस्त गाजलेल्या हिट स्ट्रीमिंग शोमध्ये आपल्या कामाने प्रेक्षकांना भुरळ पाडणारा अभिनेता भुवन अरोरा आता स्टार दिग्दर्शक कबीर खानच्या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटात भुवन बॉलिवूड स्टार कार्तिक आर्यनसोबत दिसणार आहे. कबीर खान हे बॉलिवूडमध्ये गाजलेल्या बजरंगी भाईजान, एक था टायगर आणि 83 सारख्या चित्रपटांच्या दिग्दर्शनासाठी ओळखले जातात.
अभिनेता कार्तिक आर्यनसोबत चित्रपटात मुख्य सहाय्यकाची भूमिका करत असलेला भुवन एका अनपेक्षित अवतारात दिसणार आहे. आगामी प्रोजेक्टबद्दल उत्साह व्यक्त करताना, भुवनने आयएएनएसशी शेअर केले: 'कबीर सरांसोबत काम करण्यासाठी मी खूप उत्सुक आणि आनंदी आहे. मी नेहमीच त्यांच्या चित्रपटांची आणि त्यांनी सादर केलेल्या कथांची प्रशंसा करत आलो आहे'.
भुवन पुढे म्हणाला की, 'हा देखील एक अतिशय आव्हानात्मक चित्रपट आहे ज्यासाठी खूप तयारी करावी लागत आहे. हा चित्रपट एका सत्य कथेवर आधारित आहे ज्यात लार्जर दॅन लाईफ कॅनव्हास आहे. मी यापूर्वी कधीही न केलेल्या भूमिकेत दिसणार आहे.'
फर्जी या स्ट्रीमिंग मालिकेत आपल्या कामाने प्रेक्षकांना प्रभावित करणाऱ्या अभिनेता भुवनला IMDb द्वारे ब्रेकआउट स्टारसाठी स्टारमीटर पुरस्काराने सन्मानित करण्यात आले. फर्जी मालिकेसाठी प्रिंटिंग प्रेसच्या मशिनरीवर काम करण्यासाठी त्याने मोठ्या प्रमाणावर प्रशिक्षणही घेतले होते. भुवन हा फिल्म अँड टेलिव्हीजन इन्स्टीट्यूटचा माजी विद्यार्थी आहे आणि या इंस्टीट्यूटने त्याला सिनेमाचे जग मोठ्या प्रमाणावर कसे कार्य करते याची जाणीव करून दिली आहे.