मुंबई- हॉलिवूडमधील अॅक्शन हिरॉईनस् खऱ्याखुऱ्या अँक्शन करण्यासाठी प्रसिद्ध आहेत. अँजेलिना जोली, स्कार्लेट जोहांसन, मिशेल रॉड्रिग्ज, चार्लीझ थेरॉन ही काही हॉलिवूड मधील स्त्री कलाकारांची नावं ज्या अँक्शन हिरॉईनस् म्हणून प्रसिद्ध आहेत. आता या लिस्ट मध्ये अजून एक नाव जोडले गेले ते म्हणजे प्रियांका चोप्रा जोनास! बॉलीवूडकन्या प्रियांकाने हॉलिवूडमध्ये जम बसविला असून एक प्रमुख अभिनेत्री म्हणून ती अनेक हॉलिवूड प्रोजेक्ट्सचा भाग बनलेली दिसते. प्रियांकाची प्रमुख भूमिका असलेली सिरीज 'सिटाडेल' लवकरच प्रदर्शित होणार असून त्यात तिने केलेल्या अँक्शन सीन्सचे खूप कौतुक होत आहे. मेकर्स नी सांगितले की या सिरीजमधील ८०% अँक्शन सीन्स प्रियांकाने स्वतः केले आहेत. हिंदी चित्रपट सृष्टी गाजवून प्रियांका चोप्रा आता पाश्चिमात्य चित्रपट सृष्टी गाजवतेय हे पाहून आपल्या मनोरंजनसृष्टीतील अनेकांना गर्व वाटत असेल.
प्रियांकावर स्तुतीसुमने - नवीन वेब सिरीज 'सिटाडेल' चे कार्यकारी निर्माते जोसेफ रुसो आणि अँथनी रुसो यांनी प्रियांकाची तोंडभरून स्तुती केली आहे. नुकताच 'सिटाडेल' चा लंडन मध्ये युरोपियन प्रीमियर झाला. त्यावेळी त्यांना प्रियांकाची स्तुती करताना शब्द अपुरे पडत होते. या सिरीज मध्ये, जे सहसा आढळत नाही, रिचर्ड मॅडनचे पात्र मेसन केन आणि प्रियांका चोप्रा जोनासचे पात्र नादिया सिंग यांचा स्क्रीन टाईम बरोबरीचा आहे. या गुप्तचर मालिकेत प्रियांका रिचर्ड मॅडनच्या खांद्याला खांदा लावून उभी राहिलेली दिसते.
सिटाडेलसाठी प्रियांकाने स्वतः केले स्टंट - रुसो ब्रदर्स मार्वल सिनेमॅटिक युनिव्हर्ससाठी चित्रपट बनविण्यासाठी प्रसिद्ध आहेत. आतापर्यंत त्यांनी चार चित्रपट बनविले आहेत. रुसो ब्रदर्स मधील जो रुसोने प्रामाणिकपणे कबूल केले की प्रियांका चोप्रा जोनासने रॉबर्ट डाउनी ज्युनियर आणि ख्रिस इव्हान्स यांच्यापेक्षा जास्त स्टंट केले आहेत. ते पुढे म्हणाले की, "आजपर्यंत कोणत्याही अभिनेत्याकडून आम्ही इतके शारीरिकदृष्ट्या कठीण काम करून घेतले नाही. तितके कठीण काम आम्ही प्रियांकाकडून करून घेतले. टॉम क्रुझ सर्व स्टंट्स स्वतः करतो आणि प्रियांकाने सुद्धा 'सिटाडेल' मधील स्टंट्स स्वतः केलेत, तेही कितीही रिटेल झाले तरी. तिने अथक मेहनत घेतली आहे. ती पडद्यावर नक्कीच परावर्तित झालेली दिसेल."
शुटिंगमध्ये जखमी झाली होती प्रियांका -एकदा ॲक्शन सीक्वेन्सच्या चित्रीकरणाच्या दरम्यान प्रियांकाला इजा झाली. लोकेशनवरील कॅमेर्याशी तिची टक्कर झाली. तिच्या डाव्या भुवईवर जखम झाली. यावर बोलताना प्रियांका म्हणाली की, 'तो व्रण माझ्यासाठी एखाद्या मेडल प्रमाणे आहे. मला याचा खरोखर अभिमान वाटला की मी चित्रीकरण सुरू ठेवले. मी बॉलीवूड चित्रपटांमध्येही ॲक्शन केली आहे आणि ती करताना स्वतःच्या शरीरावर कसे नियंत्रण ठेवावे हे तिथे शिकल्याचा मला फायदा इथे झाला. एकंदरीत ते चित्रीकरण खूपच रोमांचक होते. रिचर्ड मॅडन आणि प्रियांका चोप्रा जोनास अभिनित 'सिटाडेल' या गुप्तचर मालिकेचा प्रीमियर येत्या २८ एप्रिल रोजी होईल. यावेळी पहिले दोन भाग प्रदर्शित होतील आणि मग पुढे दर आठवड्याला एक नवीन भाग बाहेर येईल. या शोचा सीझन फिनाले २६ मे २०२३ रोजी प्रदर्शित केला जाणार आहे.
हेही वाचा -Actress Alia Bhatt Buys New House : आलियाने खरेदी केले नवीन घर, किंमत ऐकूण बसेल धक्का