मुंबई - film based on Adi Shankaracharya :प्रसिद्ध दिग्दर्शक आशुतोष गोवारीकर यांनी आपल्या आगामी चित्रपटाची घोषणा केली आहे. हा चित्रपट आदि शंकराचार्य यांच्या जीवनावर आधारित असेल. आचार्य शंकर सांस्कृतिक एकता न्यासच्या सहकार्याने या चित्रपटाची निर्मिती केली जाणार आहे. हा एक महाकाव्यमय चित्रपट असणार असून याचे शीर्षक 'शंकर' असे असेल. मध्य प्रदेश राज्यामधील ओंकारेश्वर येथील 'स्टॅच्यू ऑफ वननेस' या स्मारकाच्या अनावरण प्रसंगी या चित्रपटाची घोषणा करण्यात आली. मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांनी गुरुवारी ओंकारेश्वर शहरात आदि शंकराचार्य यांच्या 108 फूट उंच पुतळ्याचे अनावरण केले.
'शंकर' चित्रपटाचे पहिले पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यामध्ये वैदिक धर्माच्या रक्षणासाठी सज्ज असलेल्या आदि शंकराचार्यंचे दर्शन घडते. मागे हातात त्रिशूल घेऊन धर्मविरोधी राक्षसी शक्ती दिसत आहेत. या सर्वांपासून धर्माचे रक्षण करणे आणि धर्म प्रसार करण्यासाठी निघालेल्या शंकराचार्यांची कथा चित्रपटात पाहायला मिळणार असल्याचे आश्वासन यानिमित्तानं निर्माते देत आहेत.
या चित्रपटाबाबतचा अधिक तपशील अद्याप गुलदस्त्यात आहे. मात्र आदिशंकराचार्यंचे जीवनदर्शन या चित्रपटतून घडणार असल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत. शंकराचार्यांच्या जीवनात अनेक नाट्यमय घडामोडी आहेत. केरळमध्ये हिंदू विद्वानाच्या घरी जन्मलेल्या शंकर यांच्यावरील पितृछत्र वयाच्या तीसऱ्या वर्षे हरवले. हुशार आणि प्रतिभावान असलेले शंकराचार्यं वयाच्या सहाव्या वर्षी मोठे विद्वान बनले आणि केवळ आठव्या वर्षी त्यांनी संन्यास घेतला. त्यानंतर ते काशीला पोहोचले आणि त्यानंतर भारतभ्रमण करुन वैदिक धर्माचे पुनरुज्जीवन केले.
आदि शंकराचार्य हे भारताचे महान धर्म प्रवर्तक मानले जातात. 788 मझ्ये जन्मलेल्या शंकराचार्यांनी भारत वर्षाच्या चारही दिशांना मठांची स्थापना केली. हे हिंदू धर्माचे सर्वात पवित्र मठ समजले जातात. या मठांच्या अधिपतींना शंकराचार्य म्हटलं जातं. ज्योतिष्पीठ बद्रिकाश्रम, श्रृंगेरी पीठ, द्वारिका शारदा पीठ आणि पुरी गोवर्धन पीठ या चार मठांची स्थापना आदि शंकराचार्यंनी केली होती. त्यांना भगवान शंकराचे अवतार मानले जाते. शंकाराचार्यांचा जीवनपट अनेक घटनांनी भरलेला असल्यामुळे अनेक रंजक गोष्टी यातून मांडल्या जाऊ शकतात. हा चित्रपट धर्म आणि इतर सांस्कतिक गोष्टींवर आधारित असल्यामुळे संवेदनशीलपणे मांडण्याची जबाबदारी दिग्दर्शक आणि निर्माता म्हणून आशुतोष गोवारीकर यांच्यावर असेल. ती ही जाबाबदारी कशी निभावतात हे येणारा काळच ठरवणार आहे.