मुंबई- नेटफ्लिक्सने 'काला पानी' या नव्या वेब सिरीजची घोषणा केली असून यातून आशुतोष गोवारीकर पुन्हा एकदा अभिनयात परतणार आहे. अंदमान आणि निकोबार बेटाच्या पार्श्वभूमीवर ही कथा घडताना दिसणार आहे. यात नसर्गाच्या आक्राळ विक्राळ रुपाशी मुकाबला करत माणसाशी आपले अस्तित्व टिकवण्यासाठीचा संघर्ष दाखवला जाणार आहे.
आशुतोष गोवारीकरने शाहरुख खानसोबत 'सर्कस', 'कभी हां कभी ना' आणि 'चमत्कार' या टीव्ही मालिकांमधून काम केले आहे. २०१६ मध्ये 'व्हेन्टिलेटर' या मराठी चित्रपटात आशुतोषने अखेरचा अभिनय केला होता. त्याने १९९३ मध्ये 'पहला नशा' या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले होते आणि त्यानंतर 'स्वदेस', 'जोधा अकबर' या सुपरहिट चित्रपटांसह 'लगान' या ऑस्कर नामांकित चित्रपटाचेही दिग्दर्शन केले होते.
'काला पानी' ही मालिका नेटफ्लिक्स आणि पोशम पा पिक्चर्सचा २०२२ मध्ये आलेल्या 'जादुगार' नंतरचा दुसरा प्रोजेक्ट आहे. 'जादुगार'चे दिग्दर्शन केलेले समीर सक्सेना 'काला पानी'चे दिग्दर्शन करणार आहेत. या मालिकेतून एक फ्रेश भारतीय कथानकाची मांडणी केली जाणार आहे. निसर्गाच्या कोपापासून स्वतःला वाचवण्याचा प्रयत्न करणाऱ्या समुहाची ही गोष्ट आहे. मानव आणि निसर्ग यांच्यातील हा संघर्ष हा एकमेकांविरुद्दचा नाही तर पर्यावरणाशीसुद्धा, असल्याचे सक्सेनाने सांगितले.
'काला पानी' ही वेब सिरीजचे सह-दिग्दर्शक म्हणून अमित गोलानी काम करत आहेत. आशुतोष गोवारीकर यांच्यासह मोना सिंग, अमेय वाघ, सुकांत गोयल, अरुषी शर्मा, राधिका मेहरोत्रा, विकास कुमार, चिन्मय मांडलेकर आणि पूर्णिमा इंद्रजीत यांच्या प्रमुख भूमिका आहेत.