मुंबई - 'द केरळ स्टोरी' या हिंदी चित्रपटाच्या विरोधात निर्माण झालेल्या वादाच्या पार्श्वभूमीवर ऑस्कर पुरस्कार विजेता संगीतकार एआर रहमानने व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत आपण पाहू शकतो की केरळ मधील मशीदीमध्ये एक हिंदू जोडप्याचा सर्व हिंदू रितीरिवाजानुसार विवाह सुरू आहे. मशीदीमध्ये मंत्र पठण सुरू असल्याचे दिसते, होम अग्नी पेटवलेला दिसतो व स्नेहभोजनात शाकाहारी पद्धीच्या जेवणाच्या पंक्ती उठताना दिसतात. हा व्हिडिओ शेअर करुन ए आर रहमान यांनी मानवतेचा संदेश देण्याचा प्रयत्न केला आहे. ही एक वेगळी 'द केरळ स्टोरी' असल्याचे त्यांनी म्हटलंय.
हिंदू अंजू आणि शरथ यांचा मशीदीत विवाह- एआर रहमान यांनी 2020 साली मशिदीमध्ये झालेल्या अंजू आणि शरथ या जोडप्याच्या हिंदू विवाहाची पोस्ट शेअर केली. लग्न हिंदू रितीरिवाजांनुसार पार पडले आणि एका हिंदू पुजार्याने मशिदीमध्ये सोहळा पार पडला. लग्नासाठी निधी नसल्यामुळे तिने मशीद समितीकडे संपर्क साधला होता. या कुटुंबाने अलीकडे आपला कुलपिता गमावला होता व त्यांच्याकडे साधनांची कमतरता होती. त्यावेळी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन यांनी या लग्नाला 'केरळमधील एकतेचे उदाहरण' म्हटले होते. 'नवविवाहित जोडप्याचे, कुटुंबांचे, मशिदीचे अधिकारी आणि चेरावलीच्या लोकांचे अभिनंदन,' असे त्यांनी ट्विटही केले होते.