मुंबई- Anushka Sharma hugs Virat Kohli : अनुष्का शर्मानं विराट कोहलीला मिठी मारुन त्याचं सांत्वन केल्याचा एक फोटो इन्स्टाग्रामवर सध्या व्हायरल झालाय. या पोस्टवर खूप प्रतिक्रिया मिळत असून सबंध टुर्नामेंटमध्ये विराटनं उत्तम कामगिरी केली आहे. अंतिम सामन्यातही त्यानं चमकदार सुरूवात केली होती. परंतु अखेरीस ऑस्ट्रेलियाचं पारडं जड झालं आणि भारताच्या वाट्याला पराभवाची नामुष्की आली.
अनुष्का आणि विराट यांचा स्टेडियममधील हा फोटो सोशल मीडियावर खूप वेगानं पसरला. ऑस्ट्रेलिया विरुद्धच्या विश्वचषकच्या अंतिम सामन्यात झालेल्या भारताच्या पराभवानंतर विराट खूप नाराज झाला होता. त्यानंतर पत्नी अनुष्कानं त्याचं सांत्वन करण्याचा प्रयत्न केला. अनुष्का यात आपल्या पतीला दिलासा देत असल्याचं दिसतंय.
दुसर्या एका फोटोत अनुष्का आणि अथिया शेट्टी निराश झाल्याचं दिसत आहेत. दोघीही सामना पाहण्यासाठी एकाच स्टँडमध्ये बसल्या होत्या. विराटच्या जोडीला जेव्हा केएल राहूल आला तेव्हा दोघींमधला उत्साह पाहण्यासारखा होता. दोघांची चांगली भागीदारी होत असताना एका चेंडूनं विराटला चकवलं. 54 धावा नावावर असताना विराट कोहली माघारी परतला. परंतु तरीही सामना जिंकण्याचा विश्वास प्रेक्षकांसह तमाम देश वासियांना होता. केएल राहुलही उत्तम खेळत असताना त्यानं अर्धशतक झळकवलं तेव्हा आथिया शेट्टीला खूप आनंद झाला होता. मात्र हा आनंद जास्त काळ टिकला नाही आणि 66 धावा काढून राहुल बाद झाला.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरवर प्रेरणादायी शब्दांमध्ये भारतीय खेळाडूंचं कौतुक केलं. असामान्य प्रतिभा आणि अटूट दृढनिश्चयाबद्दल मोदी यांनी राष्ट्राबद्दल अभिमान वाढवल्याचा उल्लेख करत आम्ही आज आणि सदैव तुमच्या पाठीशी उभे आहोत, असा विश्वास खेळाडूंना दिला.