मुंबई- अभिनेत्री श्रद्धा कपूर पुन्हा एकदा स्त्री पार्ट २ चित्रपटाच्या शुटिंगसाठी सज्ज झाली आहे. या चित्रपटात राजकुमार राव आणि अपारशक्ती खुराना यांच्या प्रमुख भूमिका असणार आहेत. या चित्रपटाचे शुटिंग मध्य प्रदेशातील चंदेरी येथे होणार असून श्रद्धा कपूर चंदेरीला जाण्यासाठी मुंबई विमानतळावर दिसली.
श्रद्धा निघाली अंधेरीहून चंदेरीला - चंदेरीला स्त्री २ च्या शुटिंगसाठी जात असताना अभिनेत्री श्रद्धा कपबरने स्टायलिश सलवार कमिज घालणे पसंत केले होते. तिला विमानतळावर पाहाताच हौशी फोटोग्राफर्स व चाहत्यांनी तिला घेरले. अनेकांनी तिच्यासोबत फोटो काढले व पापाराझींनी तिला आपल्या कॅमेऱ्यातही कैद केले. श्रद्धाने आपला सोशल मीडियावर याचा एक छान व्हिडिओही शेअर केला आहे. याच्या कॅप्शनमध्ये तिने लिहिलंय, 'अंधेरी से चंदेरी.'
स्त्री २ च्या निर्मितीची घोषणा- स्त्री चित्रपटाला मिळालेल्या प्रचंड यशानंतर आगामी हॉरर कॉमेडी चित्रपटाच्या निर्मात्यांनी याचा सीक्वेल बनवण्याची घोषणा केली होती. गेल्या काही महिन्यापासून याच्या प्री प्रॉडक्शनचे काम जोरदारपणे सुरू होते. स्त्री चित्रपटाच्या सीक्वेलमध्ये पंकज त्रिपाठी आणि अभिषेक बॅनर्जी यांच्याही प्रमुख भूमिका आहेत.
राजकुमार आणि अपारशक्ती जोडी - अलिकडेच स्त्री २ चे स्क्रिप्ट रिडींग सेशन मुंबईत पार पडले. यासाठी सिनेमातील सर्व कलाकार हजर होते. अमर कौशिक दिग्दर्शित स्त्री २ हा चित्रपट २ ऑगस्ट २०२४ मध्ये रिलीज करण्याचा निर्णय चित्रपटाच्या टीमने घेतला आहे. स्त्री हा चित्रपट २०१८ मध्ये पहिल्यादा रिलीज झाला होता. यातील सर्व व्यक्तीरेखा प्रेक्षकांना आवडल्या. या चित्रपटाचा सीक्वेल यावा ही प्रेक्षकांचीच मागणी बनली होती. अखेर निर्मात्यांनी यावर सकारात्मक निर्णय घेऊन चित्रपटाचा दुसरा भाग बनवायचा निर्णय घेतला. राजकुमार आणि अपारशक्ती ही जोडी पुन्हा यात दिसणार आहे. गेल्या वर्षी रिलीज झालेल्या भेडिया चित्रपटातही राजकुमार आणि अपारशक्ती ही जोडी झळकली होती. आता भेडियाच्या निर्मात्यांनीही या चित्रपटाच्या सिक्वेलची घोषणा केली आहे.