मुंबई - Agastya Nanda greeting with Big B : दर रविवारी अमिताभ बच्चनच्या चाहत्यांची जत्रा त्यांच्या 'जलसा' या बंगल्याच्या बाहेर भरते. मुबंईसह देशाच्या कानाकोपऱ्यातून चाहते 'बिग बीं'ची एक झलक पाहण्यासाठी, त्यांना कॅमेऱ्यात कैद करण्यासाठी आतुर झालेले असतात. कालचा रविवार चाहत्यांसाठी पर्वणी ठरला. यावेळी 'बिग बी' यांच्याबरोबर त्यांचा नातू अगस्त्य नंदाही चाहत्यांना अभिवादन करण्यासाठी बाहेर आला होता.
सोमवारच्या पहाटे अमिताभ यांनी X वर चाहत्यांच्या भेटीतील काही फोटो शेअर केले आणि शुभेच्छाही दिल्या. या फोटोत 'बिग बी' चाहत्यांच्या प्रेमाचा स्वीकार करताना, त्यांना अभिवादन करताना दिसतात आणि त्यांच्यासोबत नातू अगस्त्य नंदाही आहे.
'द आर्चिज' या चित्रपटातून अभिनय क्षेत्रात पदार्पण केलेल्या अगस्त्यच्या चेहऱ्यावर आनंद फुललेला दिसत होता. त्याच्या पदार्पणाचा हा म्यूझिकल चित्रपट नुकताच नेटफ्लिक्सवर प्रवाहित झाला. यामध्ये अगस्त्यसोबत शाहरुख खानची मुलगी सुहाना खान आणि दिवंगत श्रीदेवीची लहान मुलगी खुशी कपूर यांनीही पदार्पण केलं आहे. नवेदित कलाकार डॉट, मिहिर आहुजा, वेदांग रैना आणि युवराज मेंडा हे देखील 'द आर्चिज'चा भाग आहेत. चित्रपटाबद्दल चाहत्यांमध्ये प्रचंड उत्सुकता होती. रिलीजनंतर याला संमिश्र प्रतिसाद मिळाल्याचं दिसतंय. अनेक सेलेब्रिटींनी चित्रपट पाहून आवडल्याचं कळवलंय आणि पदार्पण केलेल्या सर्वच उदयोन्मुख कलाकारांचं कौतुक केलंय.