मुंबई- अभिनेता अजय देवगण, अक्षय खन्ना आणि तब्बू यांच्या भूमिका असलेला 'दृश्यम 2' हा चित्रपट 18 नोव्हेंबर रोजी थिएटरमध्ये रिलीज होणार असल्याचे निर्मात्यांनी मंगळवारी जाहीर केले. अभिषेक पाठक दिग्दर्शित हा चित्रपट 2015 च्या क्राईम थ्रिलर दृश्यमचा सिक्वेल आहे, जो त्याच नावाच्या मोहनलाल-स्टारर मल्याळम चित्रपटाचा हिंदी रिमेक आहे. गेल्या वर्षी फेब्रुवारीमध्ये मल्याळम चित्रपटाचा सिक्वेल प्रदर्शित झाला होता.
या चित्रपटाची कथा चार जणांच्या कुटुंबावर केंद्रित आहे. पहिल्या भागात या कुटुंबावर एक संकट आले होते आणि कुटुंब प्रमुख म्हणून अजय देवगणने यावर मात केली होती. आता या भागातही ते संकट कुटुंबाचा पाठलाग करीत आहे आणि यावर पुन्हा एकदा कुटुंब प्रमुखाचा कस लागलेला पाहायला मिळणार आहे. या सिक्वेलमध्ये देवगण विजय साळगावकरची भूमिका साकारताना दिसणार आहे.
"भारतीय चित्रपटसृष्टीतील बहुचर्चित व्यक्तिरेखा विजय साळगावकर या वर्षी 18 नोव्हेंबर रोजी आपल्याला आणखी एका रोमांचक प्रवासावर घेऊन जाण्यासाठी सज्ज आहे. थरार, नाट्य आणि उत्कंठा यांमध्ये उंच भरारी घेण्याचे वचन देणारा हा सिक्वेल विजय आणि त्याच्या कुटुंबाची कथा कल्पनेच्या पलीकडे नेईल. "असे निर्मात्यांकडून एक निवेदन प्रसिध्द करण्यात आले आहे.
सिक्वेलमध्ये श्रिया सरन, रजत कपूर आणि इशिता दत्ता देखील आहेत. मंगळवारी टीम हैदराबादमध्ये शूटिंग पूर्ण करेल. दृश्यम 2 ची निर्मिती भूषण कुमार, कुमार मंगत पाठक, अभिषेक पाठक, कृष्ण कुमार यांनी केली आहे आणि संजीव जोशी, आदित्य चौकसे आणि शिव चनाना याचे सहनिर्माते आहेत. हा चित्रपट वायाकॉम 18 स्टुडिओ, टी-सिरीज आणि पॅनोरमा स्टुडिओज यांनी सादर केला आहे. हिंदी दृश्यमचा पहिला भाग दिवंगत चित्रपट निर्माते निशिकांत कामत यांनी दिग्दर्शित केला होता.
हेही वाचा -आंतरराष्ट्रीय योग दिन 2022: नियमीत योगाभ्यास करणाऱ्या १० ग्लॅमरस अभिनेत्री