मुंबई :रॉकेट्री द नंबी इफेक्ट चित्रपट हिंदी, इंग्रजी, तमिळ, तेलगू, मल्याळम आणि कन्नड भाषांमध्ये प्रदर्शित होत आहे. अभिनेता आर. माधवन यात इस्रोचे शास्त्रज्ञ नंबी नारायणन यांची भूमिका साकारताना दिसणार आहे. माधवनने या चित्रपटासाठी खूप मेहनत घेतली आहे आणि ती मेहनत चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये स्पष्टपणे दिसून येते. माधवन त्याच्या रॉकेट्री द नंबी इफेक्ट या चित्रपटासाठी खूप उत्सुक आहे. त्या निमीत्ताने त्याच्याशी ई टिव्ही भारत ने साधलेला संवाद...
रॉकेट्री द नंबी इफेक्ट ची कल्पना :मी विक्रम वेधा पूर्ण झाल्यावर आराम करीत होतो. आता एखादा यशराज टाईप रोमँटिक चित्रपट करावा असे मनात होते. त्यासुमारास माझ्या एका मित्राने मला सांगितले की नंबी नारायणन नावाचे इस्रोचे एक वैज्ञानिक आहेत आणि त्यांचे जीवन खूप मनोरंजक आहे. त्यांनी भारतासाठी स्वस्तात रॉकेट इंजिन बनविले, ते खूप हँडसम होते. त्यामुळे त्यांचे मालदिव मधील एका महिलेशी अफेयर झाले आणि त्यांनी आपली सिक्रेटस शत्रू देशाला विकली, त्यांना अटक झाली, तेथे त्यांच्या छळ करण्यात आला, शेवटी सीबीआयने केस हातात घेतली व सर्व आरोप खोटे होते हे निष्पन्न झालं आणि त्यांची सर्व आरोपांतून मुक्तता करण्यात आली. २०१९ साली त्यांना भारत सरकारने पद्म भूषण देऊन गौरवांकित केले आणि मी भारावून गेलो व त्यांच्या जीवनावर चित्रपट बनविण्याचे नक्की केले आणि त्यांना भेटण्यासाठी त्रिवेंद्रम ला गेलो.
नारायणन यांचे मत: त्यावर नंबी नारायणन यांनी आपले मतही यावेऴी व्यक्त केले.जेव्हा त्यांना जाऊन भेटलो आणि याची देह याची डोळा त्यांची कहाणी ऐकली तेव्हा मी स्तब्ध झालो. खरंतर त्यांना भेटल्यानंतर माझं आयुष्य आमूलाग्र बदललं. इतका तेजस्वी चेहरा मी याआधी बघितला नव्हता. परंतु ते जेव्हा त्यांची गोष्ट सांगत होते त्यावेळी ते खूप लालबुंद झाले होते, रागाने. तसेच त्यांच्या चेहऱ्यावरील वेदनाही खूप काही सांगत होत्या. मी स्क्रिप्ट लिहिली आणि त्यांचे मत विचारले. त्यांनी होकार दिला. परंतु मला त्यांना मर्यादा पुरुषोत्तम म्हणून पेश करायचे नव्हते त्यामुळे मी त्यांना त्यांच्यातील अवगुणांबद्दल विचारलं आणि त्यांनीदेखील काहीही न लपविता सर्व काही सांगितले. मला त्या माणसाची कमाल वाटली. त्यांना खंत होती, राग होता तो या गोष्टीचा की त्यांच्याबद्दल असलेले गैरसमज समाजमाध्यमांतून वगळले गेले नाहीयेत. त्यांची बदनामी करण्यात आल्यामुळे त्यांच्या घरात कोण मुलगी देण्यास तयार होत नाहीये. मला त्यांच्यावरील झालेल्या अन्यायाला जगासमोर मांडायचे आहे आणि तसे इतर कोणा वैज्ञानिकासोबत असे घडू नये ही अपेक्षा आहे आणि म्हणूनच मी हा चित्रपट बनवला आहे असे नंबी नारायण यांनी सांगितले.
चित्रपटाद्वारे दिग्दर्शनात पदार्पण : केल्यानंतर त्याबद्दलच्या काही खास आठवणी सांगताना ते म्हणाले की,पहिल्या दिवशी मी जेव्हा सेटवर पोहोचलो तेव्हा माझी बोबडी वळली होती. इतकी मोठी जबाबदारी आपल्याला पार पाडता येईल का ही शंका होती. परंतु तेव्हड्यात माझ्या एका मित्राचा अमेरिकेतून फोन आला आणि त्याने मला सल्ला दिला की असे मैदान सोडून जाऊ नकोस. एक तरी शॉट दिग्दर्शित कर. मी हिम्मत केली आणि पहिला शॉट घेतला. त्यानंतर थोडी हिम्मत वाढली आणि दुसरा शॉट घेतला. असे करता करता चित्रपट पूर्ण झाला आणि आता मी तुझ्यासमोर बसलो आहे. असा अनुभव त्यांनी सांगितला.