मुंबई - बॉलिवूड फिल्म इंडस्ट्रीचा अनभिषज्ञ सम्राट आदित्य चोप्रा हा खऱ्या अर्थाने सर्वात यशस्वी आणि कल्पक निर्मात्यांपैकी एक आहे. लेखक. निर्माता आणि दिग्दर्शक म्हणून आदित्या चोप्रा याचे भारतीय चित्रपटसृष्टीत महत्त्वाचे योगदान दिले आहे. आदित्य चोप्रा रविवार २१ जानेवारी रोजी 52 वर्षांचा होईल.
आदित्यचे दिवंगत वडील यश राज चोप्रा यांनी स्थापन केलेली यशराज फिल्म्स हे बॉलीवूडमधील सर्वात यशस्वी प्रॉडक्शन हाऊसपैकी एक आहे. वेगवेगळ्या जॉनरचे आणि विविध शैलीतील हिट चित्रपटांच्या निर्मितीसाठी यशराज फिल्म्स ओळखले जाते. आदित्य चोप्राची कथा सांगण्याची पद्धत इतरांहून अधिक रंजक असल्यामुळे त्याचे चित्रपट अद्वितीय बनतात.
शाहरुख खान आणि आदित्य चोप्रा यांची दशकानुदशके जुनी यारी आहे. दोघांनी मिळून बॉलिवूडला असंख्या हिट चित्रपट बहाल केले. यातील बहुतेक चित्रपट हे एकतर आदित्यने दिग्दर्शित केले होते किंवा निर्मित केले होते. आदित्य चोप्रा दिग्दर्शित किंग खान शाहरुखची मुख्य भूमिका असलेले काही खास चित्रपट असे आहेत:
दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे (1995)
आदित्य चोप्राने 1995 मध्ये 'दिलवाले दुल्हनिया ले जायेंगे' या चित्रपटातून दिग्दर्शनात पदार्पण केले. शाहरुख खान आणि काजोल यांची मुख्य भूमिका असलेला हा चित्रपट शाहरुख खानच्या जीवनातील सर्वात आयकॉनिक रोमँटिक ड्रामा मानला जातो. हा चित्रपट बॉलिवूडमधील सर्वाधिक हिट चित्रपट ठरला आहे.
रब ने बना दी जोडी (२००८)
या रोमँटिक नाटयमय चित्रपटामध्ये शाहरुख खान आणि अनुष्का शर्मा मुख्य भूमिका आहेत. या चित्रपटाची कथा एका मध्यमवयीन पुरुषाभोवती फिरते जो आपल्या पत्नीचे प्रेम जिंकण्यासाठी स्वत: ला बदलतो. या चित्रपटाला प्रेक्षकांचा जबरदस्त सकारात्मक प्रतिसाद मिळाला होता.
मोहब्बतें (2000)
आदित्य चोप्रा दिग्दर्शित रोमँटिक ड्रामा असलेल्या मोहब्बतें चित्रपटात अमिताभ बच्चन, शाहरुख खान आणि ऐश्वर्या राय बच्चन यांच्या प्रमुख भूमिका होत्या. ही एका कठोर शिस्तप्रिय प्रिन्सिपलची कथा आहे, ज्याचा प्रेमप्रकरणाबाबत विरोध असतो. आपल्या गुरुकुलात कठोर शिस्त लावण्यावर त्यांचा विश्वास असतो. यात शाहरुख खानने राज आर्यन या संगीत शिक्षकाची भूमिका साकारली होती. राज आर्यनचे गुरुकुलात येणे आणि प्रेमाला समर्थन देणे यामुळे हा चित्रपट वेगळा ठरला. जबरदस्त गाणी, शाहरुख आणि अमिताभ यांची ऑन स्क्रिन केमेस्ट्री यामुळे या सिनेमाला बॉक्स ऑफिसवर तुफान यश मिळाले.