मुंबई - अभिनेता अल्लू अर्जुन 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्यात उपस्थित राहण्यासाठी दिल्लीला रवाना झालाय. सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा राष्ट्रीय पुरस्कार मिळवणारा अल्लु अर्जुन सोमवारी त्याची पत्नी अल्लू स्नेहा रेड्डीसोबत विमानतळावर दिसला. ऑगस्टमध्ये जाहीर झालेल्या 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांमध्ये 'पुष्पा: द राइज'मधील त्याच्या दमदार अभिनयासाठीअल्लु अर्जुनला सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार जाहीर झाला होता. अल्लू अर्जुनपूर्वी 'आरआरआर' चित्रपटाचे दिग्दर्शक एसएस राजामौली आणि संगीतकार एमएम कीरवाणी हे देखील 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारासाठी राष्ट्रीय राजधानीत दाखल झाले आहेत.
69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कार सोहळ्याला हजर राहण्यासाठी राष्ट्रीय राजधानी दिल्लीकडे रवाना होत असताना अल्लू अर्जुन आणि त्याची पत्नी स्नेहा हैदराबाद विमानतळावर पापाराझींच्या कॅमेऱ्यात कैद झाले. अल्लू अर्जुननं यावेळी काळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला होता. त्याच्या पत्नीने आकाशी निळ्या रंगाच्या क्रॉप टॉपमध्ये तिचा एअरपोर्ट लूक फ्लेर्ड डेनिमच्या जोडीने मस्त ठेवला होता.
अल्लू अर्जुन, एसएस राजामौली आणि एमएम कीरवाणी हे इतर राष्ट्रीय पुरस्कार विजेत्या कलाकारांमध्ये सामील होतील. भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांच्या हस्ते 17 ऑक्टोबर 2023 रोजी विज्ञान भवन, नवी दिल्ली येथे हा सत्कार सोहळा आयोजित करण्यात आलाय. माहिती आणि प्रसारण मंत्रालयाने 24 ऑगस्ट 2023 रोजी 69 व्या राष्ट्रीय चित्रपट पुरस्कारांसाठी विजेत्यांची घोषणा एका पत्रकार परिषदेत केली होती.
अल्लू अर्जुनला फिल्म इंडस्ट्रीत 'बनी' म्हणून ओळखलं जातंय. 1985 मध्ये त्यानं बालकलाकार म्हणून अभिनयाची सुरुवात केली होती. 2003 मध्ये त्यानं 'गंगोत्री' चित्रपटात पहिली प्रमुख भूमिका साकारली. तो तेलुगु फिल्म इंडस्ट्रीचा अतिशय लोकप्रिय नायक आहे. अलिकडेच पुष्पा चित्रपटाचा पहिला भाग प्रचंडगाजला. या चित्रपटाच्या दुसऱ्या भागाची चाहते प्रतीक्षा करत आहेत. तो पुष्पा: द रुलच्या शूटिंगमध्ये खूप गुंतला आहे. सुकुमार दिग्दर्शित 'पुष्पा 2' हा चित्रपट 15 ऑगस्ट 2024 रोजी थिएटरमध्ये दाखल होईल.