मुंबई - जुन्या हिंदी क्लासिक चित्रपटाच्या शौकिनांसाठी एक आनंदाची बातमी आहे. बावर्ची, मिली आणि कोशिश या गाजलेल्या क्लासिक चित्रपटांच्या अधिकृत रिमेकची घोषणा करण्यात आली आहे. एनसी सिप्पी प्रॉडक्शन हाऊसच्या बॅनरखाली हे चित्रपट सत्तरच्या दशकात बनले होते. गुलजार यांनी १९७१ मध्ये दिग्दर्शित केलेला कोशिश हा चित्रपट हॅप्पीनेस ऑफ अस अलोन या जपानी चित्रपटाला वाहिलेली श्रद्धांजली होती. या चित्रपटात संजीव कुमार आणि जया बच्चन यांनी जीवनाशी लढणाऱ्या मुक बधीर व्यक्तीरेखा साकारल्या होत्या.
संजीव कुमार यांना कोशिश चित्रपटासाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्याचा पुरस्कार मिळाला होता तर गुलजार यांना उत्कृष्ट पटकथासाठी भारताचा राष्ट्रीय पुरस्कार मिळाला होता. ऋषिकेश मुखर्जी दिग्दर्शित बावर्ची हा चित्रपट १९६६ च्या बंगाली चित्रपट गल्पो होलेओ सात्तीचा हिंदी रिमेक होता. मूळ बंगाली चित्रपटाचे दिग्दर्शन तपन सिन्हा यांनी केले होते आणि यात राजेश खन्नाने घरामध्ये पडेल ते काम करणाऱ्या मध्यम वर्गीय घरातील नोकराची भूमिका साकारली होती.
ऋषीकश मुखर्जी यांच्या मिली चित्रपटात अमिताभ बच्चन आणि जया बच्चन यांनी मुख्य भूमिका केल्या होत्या. एक निराश झालेला दारुचा व्यसनी आणि त्याची उत्सफुर्त शेजारी यांच्यातील रोमान्सची ही सुंदर कथा होती. मिळालेल्या माहितीनुसार या चित्रपटांच्या रिमेकची प्रक्रिया सुरू झाली आहे. एनसी सिप्पी यांचे नातू आणि राज सिप्पी यांचा मुलगा समीर राज सिप्पी हे या रिमेकची निर्मिती करणार आहेत. त्यांनी यापूर्वी जादुगार फिल्म्सच्या वतीने मिसेस अंडरकव्हर या चित्रपटाची निर्मिती झी५ साठी केली होती.
जादुगर फिल्म्स प्रॉडक्शनचे अनुश्री मेहता आणि अबीर सेनगुप्ता यांनी या रिमेकबद्दल सांगितले की, सर्वकाळात हिट असलेल्या या तीन चित्रपटांच्या रिमेकची आम्ही तयारी करत आहोत. या प्रवासाला सुरुवात करण्यासाठी आम्ही खूप उत्साही आहोत. या तीन महान चित्रपटांची पुनर्निर्मिती ही आमच्यासाठी खूप मोठी जाबाबदारीची गोष्ट आहे. असे चित्रपट पाहातच आम्ही मोठे झालो आहोत. नव्या पिढीलादेखील हा समृद्ध सिनेमॅटिक वारसा कळावा यासाठी आमचा हा प्रयत्न आहे.