बीड - ज्या विनायक मेटेंना गोपीनाथ मुंडेंनी आमदारकी दिली, तेच आता पंकजा मुंडेंवर बिनबुडाचे आरोप करत आहेत. मेटेंनी आधी भाजपच्या आमदारकीचा राजीनामा द्यावा, नंतर पंकजांवर आरोप करावेत. मेटे स्वतःचा स्वार्थ साधण्याचा प्रयत्न करत असल्याचे वक्तव्य भाजपचे बीड जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी केले.
बीडचे भाजप जिल्हाध्यक्ष रमेश पोकळे यांनी पत्रकार परिषद घेतली शिवसंग्रामचे अध्यक्ष विनायक मेटे यांनी बीडमध्ये राष्ट्रवादीला पाठिंबा देण्याचा निर्णय घेतला. त्या पार्श्वभूमीवर रमेश पोकळे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. पोकळे म्हणाले, की मेटे मराठा कार्ड पुढे करुन स्वार्थी राजकारण करत आहेत. दरम्यान, मेटे आणि मुंडे यांच्यामध्ये नेहमीच कुरघोडीचे राजकारण जिल्ह्यात पाहायला मिळते. या आधीही दोघांमध्ये अनेक प्रकरणात वाद झडले होते.
बीड सोडून युतीला पाठिंबा देऊ, असा पावित्रा विनायक मेटे यांनी काही दिवसांपूर्वीच घेतला होता. पण, भाजपच्या नेत्यांनी असे करता येणार नसल्याची सक्त ताकीद दिली होती. त्या पार्श्वभूमीवर मेटे काय निर्णय घेतात हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार होते. आता मेटेंच्या निर्णयामुळे सर्व चित्र स्पष्ट झाले आहे. भाजपच्या उमेदवार प्रीतम मुंडे यांच्याविरोधात मेटेंनी प्रचाराला सुरुवात केली आहे.
विनायक मेटे यांनी पंकजा मुंडेंवर आरोप केले आहेत. ते म्हणाले, की पंकजा मुंडे बीड जिल्ह्यात शिवसंग्राम संपवण्याच्या तयारीत आहेत. २०१४ च्या विधानसभा निवडणुकीमध्ये भाजपच्या नेत्यांनी फितुरी केली नसती, तर मी तेव्हाच आमदार झालो असतो. त्यावेळी भाजपचे जिल्हाध्यक्ष आणि काही पदाधिकाऱ्यांनी माझ्या विरोधात प्रचार केला.