महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

रावेर मतदारसंघात होणार लेवा समाजाच्या मतांचे ध्रुवीकरण; खडसे विरुद्ध पाटील रंगणार सामना - bjp

आताच्या निवडणुकीत रावेर लोकसभेत रक्षा खडसे आणि उल्हास पाटील यांच्यात होणार प्रमुख लढत... २०१४ च्या निवडणुकीत रावेर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झालेले तत्कालीन विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यांच्या जागी रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्यावर आल्याने माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. आघाडीतून राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांनी भाग्य अजमावले होते.

पाटील विरुद्ध खडसे रंगणार सामना

By

Published : Apr 5, 2019, 11:20 AM IST

Updated : Apr 5, 2019, 12:12 PM IST


जळगाव- रावेर लोकसभा मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे व काँग्रेसचे उमेदवार डॉ. उल्हास पाटील यांच्यात प्रमुख लढत आहे. हे दोन्ही लेवा समाजाचे तगडे उमेदवार यावेळी निवडणुकीच्या रिंगणात आहेत. वंचीत बहुजन आघाडीकडून नितीन कांडेलकर यांनी अर्ज दाखल केला आहे. मतदारसंघात दुसऱ्या क्रमांकाची मते असलेल्या लेवा पाटीदार समाजातील तुल्यबळ उमेदवारांमुळे मतांचे ध्रुवीकरण होण्याची शक्यता आहे. दरम्यान मराठा, गुर्जर, माळी, बौद्ध आदी समाज निर्णायक ठरणार आहेत.

पाटील विरुद्ध खडसे रंगणार सामना

जलसंपदामंत्री गिरीश महाजन व माजीमंत्री एकनाथ खडसे या दोन्ही नेत्यांचे विधानसभा मतदारसंघही याच मतदारसंघात येतात. भाजपत अंतर्गत गटबाजी असली तरी निवडणुकीच्या तोंडावर 'तेरी भी चुप... मेरी भी चुप' अशी भूमिका घेवून निवडणुका पार पाडल्या जातील. भाजपसाठी मतदारसंघ अनुकूल असला तरी सत्तेपासून पाच वर्ष दूर राहिल्याने राष्ट्रवादी -कॉंग्रेसचेही अंतर्गत वाद मिटल्यासारखे असल्याने आघाडी मजबूत दिसून येते. माजी खासदार डॉ. उल्हास पाटील व माजी आमदार शिरीष चौधरी यांच्यात दिलजमाई झाली आहे. भाजपची अनेक वर्षापासून मतदारसंघात पकड घट्ट आहे. गेल्या निवडणुकीत मोदी लाटेमुळे रक्षा खडसे विक्रमी मतांनी विजयी झाल्या होत्या. या मतदारसंघात मराठा समाजाचे मताधिक्य साडेतीन लाखांच्या वर आहे. मात्र, या ठिकाणी दोन लाखात मताधिक्य असलेल्या लेवा समाजाचाच खासदार निवडून येत असतो. या निवडणुकीत १७ लाखांच्या वर मतदानाचा हक्क मतदार बजावतील. गेल्या पंचवार्षिक निवडणुकीच्या तुलनेत सुमारे दीड लाख नव्याने नाव नोंदणी झालेल्या मतदारांची भर पडणार आहे. यंदाच्या निवडणुकीपूर्वी वंचित बहुजन आघाडीने लोकसभा उमेदवारीसाठी कंबर कसली आहे. भाजपच्या बालेकिल्यात सुरुंग लावण्यासाठी राजकीय पक्षांनी व्यापक रणनिती, व्युहरचना आखणेही सुरू केले आहे. शिवसेनेचे जिल्हाप्रमुख चंद्रकांत पाटील व खडसेंमधील हाडवैर पाहता ते निवडणुकीवर थेट परिणाम करणारे ठरेल.

रावेर मतदारसंघात लेवा पाटीदार समाजाचे सुमारे २ लाख ५ हजार मतदार आहेत. आतापर्यंतचा इतिहास पाहता या मतदारसंघातून लेवा पाटीदार समाजाला संधी मिळाली आहे. पुनर्विभाजनानंतर २००९च्या निवडणुकीतही राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे मराठा समाजाचे अॅड. रवींद्र पाटील हे उमेदवार निवडणूक रिंगणात होते. या चुरशीच्या निवडणुकीत लेवा पाटीदार समाजाचे व भाजपचे उमेदवार हरिभाऊ जावळे यांचा विजय झाला होता. यानंतर सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपच्या रक्षा खडसे यांच्या विरोधात राष्ट्रवादीचे मनीष जैन हे अल्पसंख्याक जैन समाजाचे उमेदवार रिंगणात होते. या निवडणुकीतही रक्षा खडसेंच्या माध्यमातून लेवा पाटीदार समाजाला संधी मिळाली. या निवडणुकीत लेवा पाटीदार समाजाचे डॉ. उल्हास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी दाखल केली होती. आता मात्र, डाॅ. उल्हास पाटील हे काँग्रेसतर्फे रिंगणात उतरले आहेत. या मतदारसंघात भाजपच्या रक्षा खडसे, काँग्रेसचे डाॅ. उल्हास पाटील तर वंचित बहुजन आघाडीने नितीन कांडेलकर यांनी अर्ज दाखल केले आहेत. खडसे व डाॅ. पाटील हे दाेघे अनुभवी असून त्यांना नेत्यांचे खंबीर पाठबळ आहे.

समाजनिहाय मतांचे गणित-


रावेर मतदारसंघात मराठा समाज ३ लाख ७० हजार तर दोन लाख ५ हजारांवर लेवा समाजाचे मतदार आहेत. मुस्लिम २ लाख, बौद्ध २ लाख १० हजार, गुर्जर ७८ हजार, माळी ८५ हजार, कोळी १ लाख १२ हजार, पावरा आणि पारधी २१ हजार, धनगर ४३ हजार, बंजारा ७० हजार, तडवी ४४ हजार, राजपूत ४२ हजार, तेली ३८ हजार, राजस्थानी ८० हजार अशी समाजनिहाय मते आहेत.

नवमतदार ठरणार महत्त्वाचे-


यंदाच्या निवडणुकीत १७ लाख ६० हजार १७५ मतदार आहेत. त्यात ९ लाख १७ हजार ४८८ पुरुष तर ८ लाख ४२ हजार ६६१ महिला मतदार आहेत. गत निवडणुकीच्या तुलनेत यंदाच्या निवडणुकीसाठी तब्बल १ लाख ६८ हजार ६९६ मतदार वाढले आहेत. हे नवमतदार आता कोणाकडे वळतात, यावरही विजयाचे गणित अवलंबून आहे.

अशी आहे मतदारसंघाची सद्य:स्थिती-


रावेर लोकसभा मतदारसंघात रावेर, चोपडा, यावल, भुसावळ, मुक्ताईनगर, जामनेर, बोदवड, नांदुरा, मलकापूर या तालुक्यांतील चोपडा ते मलकापूरपर्यंत ८३५ गावांचा समावेश असून ४१ जिल्हा परिषद गट व ८२ पंचायत समितीचे गण आहे. रावेर तालुक्यातील ११६ गावे, यावल ८९ गावे, भुसावळ ५१ गावे, चोपडा ११९ गावे, मुक्ताईनगर ८४ गावे, बोदवड ५३ गावे, जामनेरची १६० गावे, मलकापूर ६४ गावे, नांदुरा ९९ अशा ८३५ गावांचा समावेश आहे. यात ५३ आदिवासी गावांचा समावेश आहे. रावेर लोकसभा मतदारसंघात रावेर, चोपडा, यावल, फैजपूर, सावदा, मुक्ताईनगर, वरणगाव, जामनेर, भुसावळ, बोदवड, मलकापूर, नांदुरा अशा १२ नगरपालिका आहे. मुक्ताईनगर, सावदा, भुसावळ , बोदवड, मलकापूर, नांदुरा या नगरपालिका भाजपच्या ताब्यात आहे. तर यावल, फैजपूरवर आमदार हरिभाऊ जावळेंचे वर्चस्व आहे. वरणगाव नगरपालिकेवर नगराध्यक्ष सुनील काळेंच्या माध्यमातून जलसंपदामंत्री गिरीश महाजनांचे वर्चस्व आहे. भारिप बहुजन महासंघाचे जिल्हाध्यक्ष विनाेद साेनवणे, पीआरपीचे नेते जगन साेनवणे यांचे संघटनही या मतदारसंघात महत्त्वाचे आहे. या दाेन्ही पक्षांची ताकद भुसावळ शहरात अधिक आहे. ते निवडणुकीत काेणाच्या पाठीशी उभे राहतात? हे पाहणेही औत्सुक्याचे ठरणार आहे.

गेल्या निवडणुकीतील स्थिती

1) रक्षा खडसे (भाजप : विजयी) मते ६ लाख ५ हजार ४५२

मताधिक्य : ३ लाख १८ हजार ६८

2) मनीष जैन (राष्ट्रवादी : पराभूत) मते २ लाख ८७ हजार ३८४


पाच वर्षांत झालेले बदल


२०१४च्या लोकसभा निवडणुकीत भाजप उमेदवार रक्षा खडसे यांच्या विजयानंतर माजीमंत्री एकनाथ खडसे यांनी राष्ट्रवादीचे आमदार संजय सावकारे यांना भाजपत घेवून त्यांना विधानसभेसाठी उमेदवारी दिली व निवडूनही आणले. या मतदारसंघात भाजप रुजविण्याचे काम खडसेंनी केले. भुसावळ नगरपालिकेवर सन २०१५च्या निवडणुकीत प्रथमच स्वबळावर भाजपची सत्ता आली. यापुर्वी भुसावळ पालिकेवर खडसेंचा प्रभाव असला तरी भाजपला नगरपालिकेवर स्वबळावर सत्ता मिळवता आली नव्हती. या पाठोपाठ वरणगाव, बोदवड व मुक्ताईनगर या नगरपंचायतींवरही भाजपने आपला झेंडा रोवला आहे. चोपडा विधानसभेवर शिवसेनेचा झेंडा आहे. याशिवाय रावेर, जामनेर, मुक्ताईनगर, भुसावळ, मलकापूर आदी ठिकाणी भाजपचे वर्चस्व आहे. रावेर वगळता इतर नगरपालिका, जिल्हा परिषद, सर्वच पंचायत समिती युतीच्या ताब्यात आहे. तर भुसावळची बाजार समिती राष्ट्रवादीच्या ताब्यात आहे.

निवडणुकीवर प्रभाव-


गेल्या निवडणुकीत भाजपने अच्छे दिनचा नारा दिला होता. काळा पैसा परत आणणे, प्रत्येकाच्या खात्यात पैसे टाकणे, स्वामीनाथन आयोग लागू करणे आदी विषय ऐरणीवर होते. आता निवडणुकीच्या तोंडावर शेतकऱ्यांना वार्षिक सहा हजार रुपये देणारी प्रधानमंत्री कृषी सन्मान योजना, पुलवामा हल्ल्यानंतर झालेला सर्जीकल स्ट्राईक व मोदी है तो मुमकिन है या नाऱ्यावर आगामी निवडणूक हाेईल.

असे झाले पक्षबदल-


लोकसभेच्या २०१४नंतरच्या निवडणुकीनंतर भुसावळचे राष्ट्रवादीचे आमदार तथा पालकमंत्री संजय सावकारे यांनी माजी मंत्री खडसेंच्या नेतृत्वात भाजपमध्ये प्रवेश घेतला. नंतर झालेल्या विधानसभा निवडणुकीत ते निवडून आले. मुक्ताईनगर येथील रहिवासी तथा राज्याच्या अल्पसंख्याक आयोगाचे माजी अध्यक्ष मो. हुसेन खान यांनी २९ नोव्हेंबर २०१८ रोजी काँग्रेस प्रदेश कार्यालयात माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांची भेट घेतली. भाजपवर तोंडसुख घेत काँग्रेसमध्ये प्रवेश घेतला. भुसावळातील माजी आमदार संतोष चौधरी यांनी राष्ट्रवादीतून शिवसेनेत नंतर पालिका निवडणूकीत स्वबळावर जनाधारच्या माध्यमातून व आता पुन्हा राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये प्रवेश केला.

२०१४ ची अशी स्थिती

सन २०१४ च्या निवडणुकीत रावेर लोकसभा निवडणुकीत भाजपच्या पहिल्या यादीत उमेदवारी जाहीर झालेले तत्कालीन विद्यमान खासदार हरिभाऊ जावळे यांचे तिकीट कापण्यात आले होते. त्यांच्या जागी रक्षा खडसे यांना उमेदवारी देण्यात आली. हा मतदार संघ राष्ट्रवादीच्या वाट्यावर आल्याने माजी खासदार डॉ. उल्हास पाटील यांनी अपक्ष उमेदवारी केली होती. आघाडीतून राष्ट्रवादीचे उमेदवार मनीष जैन यांनी भाग्य अजमावले होते.

Last Updated : Apr 5, 2019, 12:12 PM IST

ABOUT THE AUTHOR

...view details