महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / elections

वंचित बहुजन आघाडी म्हणजे भाजपची टीम 'बी' - हर्षवर्धन पाटील - वंचित बहुजन आघाडी

राज्यात ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद जास्त आहे. त्याठिकाणी वंचित बहुजन आघाडी उभारून मतांचे विभाजन कसे करता येईल, याकडे प्रकाश आंबेडकर लक्ष देत आहेत.

हर्षवर्धन पाटील १

By

Published : Apr 12, 2019, 11:02 AM IST

औरंगाबाद- वंचित बहुजन आघाडी म्हणजे भाजपची टीम-बी असल्याचा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते हर्षवर्धन पाटील यांनी केला आहे. निवडणुकीच्या आधी जागावाटप संदर्भात चर्चा सुरू असताना प्रकाश आंबेडकर यांनी राज्यात आपले दौरे सुरू केले. इतकेच नाही तर काही ठिकाणी आपले उमेदवार देखील घोषित केले. त्यामुळे त्यांना आमच्यासोबत आघाडी करायची नव्हती. औरंगाबादचे काँग्रेसचे उमेदवार सुभाष झांबड यांच्या प्रचार सभेत हर्षवर्धन पाटील बोलत होते.

हर्षवर्धन पाटील यांची प्रतिक्रिया


राज्यात ज्या ठिकाणी काँग्रेसची ताकद जास्त आहे. त्याठिकाणी वंचित बहुजन आघाडी उभारून मतांचे विभाजन कसे करता येईल, याकडे प्रकाश आंबेडकर लक्ष देत आहेत. निवडणुकीच्या आधी त्यांच्यासोबत आघाडी करण्यासाठी अनेक वेळा चर्चा झाली. मात्र, चर्चेचा वेळेस एक कारण सांगायचे आणि प्रत्यक्षात कृतीमध्ये दुसरेच करायचे, हे आमच्या लक्षात आल्यानंतर आम्ही प्रकाश आंबेडकर यांचा नाद सोडला.

आज ते कुणाचे काम करत आहे हे सर्व लोकांना माहीत आहे. वंचित आघाडी म्हणजेच भाजपची बी टीम म्हणून काम करते, हे लोकांच्या लक्षात आल्याने राज्यातील जनता ही आमच्या आघाडीसोबत असेल. सध्या राज्यात दुष्काळ आहे. मात्र, दुष्काळ हाताळण्यामध्ये सरकार अपयशी ठरले आहे. निवडणूक आयोगाने देखील दुष्काळाची कुठलीच कामे थांबू नये असे स्पष्ट सांगितले. मात्र, आज राज्यात भीषण परिस्थिती निर्माण झाली असून सरकार त्याकडे दुर्लक्ष करत आहेत.

औरंगाबादमध्ये आगामी काळात राज ठाकरेंची सभा घ्यावी, अशी इच्छा काँग्रेस कार्यकर्त्यांची आहे. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी लोकसभा निवडणूक न लढविण्याचा निर्णय घेतल्याने त्यांच्यासोबत लोकसभा आघाडीबाबत कुठलीही चर्चा झाली नाही. मात्र, त्यांना सरकार विरोधात भाषण करायची इच्छा आहे. त्यामुळे ते सर्वत्र सभा घेत आहेत. आगामी काळात विधानसभा निवडणुकीच्या अनुषंगाने लोकसभा निवडणूक झाल्यावर चर्चा होऊ शकते, असा अंदाज त्यांनी व्यक्त केला.

राधाकृष्ण विखे पाटील यांच्याबद्दल बोलताना हर्षवर्धन पाटील म्हणाले, अहमदनगरमध्ये प्रचार करणार नाही अशी भूमिका त्यांनी घेतली असली तरी राज्यात प्रचार करणार, असे त्यांनी सांगितले आहे. मात्र, ते कुठे प्रचार करत आहेत हे माहीत नाही, मी माझा दौरा पूर्ण करत असल्याचे सांगत त्यांनी विखेंनाही टोला लगावला.

ABOUT THE AUTHOR

...view details