बुलडाणा- शेळ्या चोरी प्रकरणातील आरोपीला पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर गावांतील काही नागरिकांनी विरोध करत दगडफेक केल्याची घटना घडली आहे. लोणार तालुक्यातील बीबी पोलीस स्टेशन हद्दीतील खापरखेड घुले या गावात गुरुवारी(13 मे)ला पोलिसांवर हा हल्ला झाला. त्यानंतर बीबी पोलीसांनी या हल्ला प्रकरणात 14 जणांविरुद्ध गुन्हे दाखल केले आहेत. तर 8 आरोपींना ताब्यात घेतले आहे.
शेळ्या चोरांना पकडण्यासाठी गेलेल्या पोलीस पथकावर दगडफेक, 14 जणांविरुद्ध विरुद्ध गुन्हा दाखल - पोलीस पथकांवर शेळ्या चोर आरोपींचा हल्ला
एप्रिल महिन्यामध्ये बीबी येथील रहिवासी शेख रियाज शेख सुभान यांच्या 51 हजार रुपये किमतीच्या शेळ्या चोरीला गेल्या होत्या. याबाबतची तक्रार बीबी पोलीस ठाण्यात दाखल झाली होेती. या प्रकरणाचा तपास करून पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता, शेळी चारणारा चोरटे हे खापरखेड घुले येथील असल्याची माहिती मिळाली होती.
८ जण ताब्यात ६ फरार-
पोलिसांना मिळालेल्या माहितीवरून गुरुवारी खापरखेड घुले येथे आरोपींना ताब्यात घेण्यासाठी एक पथक गावात पाठवले. त्यावेळी तेथील गावकऱ्यांनी सुरवातील पोेलिसांना आरोपींना ताब्यात घेण्यास विरोध केला. त्यानंतर काही नागरिकांनी पोलीस पथकावर थेट दगडफेक सुरू केली. या दगडफेकीत पोलिसांच्या वाहनांचे नुकसान झाले. तर पथकातील काही पोलीस किरकोळ जखमी झाले. याप्रकरणी पोलिसानी 14 जणांविरुद्ध विविध कलमान्वये गुन्हा दाखल करून 8 आरोपींना ताब्यात घेतले आहे. तर 6 जण अजूनही फरार आहे.