कोल्हापूर : शेतजमिनीचा निकाल तुमच्या बाजूने लावून देतो, तुम्ही किती रुपये देऊ शकता म्हणत एक कोटी रुपयांची मागणी केल्याप्रकरणी निष्पन्न झाल्याने संशयित लाचखोर पोलीस नाईक जॉन वसंत तिवडे ( Police Naik John Vasant Tivade ) (रा. कोरोची, ता. हातकणंगले) नेमणूक पोलीस मुख्यालय याच्याविरुद्ध शाहुपूरी पोलीस ठाण्यात गुन्हा ( Shahupuri police station )दाखल करण्यात आला आहे. तिवडे हा सध्या पसार असून, त्याचा शोध सुरू असलेची माहिती लाचलुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलीस उपअधीक्षक आदिनाथ बुधवंत यांनी दिली.
घटनाक्रम साधारण असा : तक्रारदार यांचे देहुगाव (ता. हवेली, जि. पुणे) येथील शेतजमिनीचे महाराष्ट्र महसूल न्यायाधिकरण पुणे, खंडपीठ पुणे येथे दावा चालू आहे. यावेळी एका अनोळची व्यक्तीने तक्रारदार यांचेशी फोनवरून संपर्क साधून एका महत्त्वाच्या विषयावर तुमच्याशी बोलायचे आहे, तुम्ही भेटा असे सांगितले. त्यानुसार तक्रारदाराने दिनांक २५ फेब्रुवारी २०२२ रोजी कोल्हापूर जिल्हाधिकारी कार्यालय येथे येऊन अनोळखी व्यक्तीची भेट घेतली.
फिर्यादींनी केली लाच लुचपत विभागात तक्रार : यावेळी तो व्यक्ती पोलीस वर्दीमध्ये त्यांना भेटली. यावेळी त्या पोलिसाने पुणे येथील दाव्याबाबत तुमच्या विरुद्ध पार्टीने आम्हाला एक कोटीची ऑफर दिली आहे. तुम्ही किती देता ते बोला, तसेच केसचा निकाल तुमच्या बाजुने लावून देतो, तुम्ही किती रुपये देवू शकता? समोरच्या पार्टीने एक कोटीची ऑफर दिली आहे असे म्हणत लाचेची मागणी केली होती. त्याबाबत तक्रारदार यांनी लाचलुचपत विभागाकडे तक्रार केली होती.