मीरा भाईंदर - शहरात कोरोनाचा कहर वाढत आहे. यामुळे रुग्णालयाची कमतरतेमुळे पालिका प्रशासनाने एक 80 बेडचे कोविड सेंटर सुरू केले आहे. यासंदर्भात खासदार राजन विचारे, आमदार गीता जैन, पालिका आयुक्त दिलीप ढोले यांनी कोविड सेंटरची पाहाणी केली. लवकरच कोविड सेंटर सुरू करण्यात येत असल्याची माहिती दिलीप ढोले यांनी दिली.
उत्तनवासीयांना दिलासा -
उत्तन परिसरातील नागरिकांसाठी डोंगरी चौक येथे कोविड सेंटर उभारणीसाठी खासदार राजन विचारे यांनी आयुक्तांसोबत पाहणी दौरा केला, मीरा भाईंदर महापालिका क्षेत्रात भाईंदर पश्चिमेकडील उत्तन येथील नागरिक मच्छीमारी करून आपला उदरनिर्वाह करत असतात. या परिसरात मच्छीमार व्यवसायिकांची ये-जा अधिक असल्याने याठिकाणी कोरोना चा प्रादुर्भाव वाढून रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत चालली होती. त्यामुळे येथील गरीब मच्छिमारांना शहरात बेड उपलब्ध होत नसल्याने ते घरात उपचार घेतात. यामुळे त्या कुटुंबातील इतरांना ही कोरोनाची लागण होत होती. प्रादुर्भाव वाढू नये यासाठी उत्तन परिसरातील डोंगरी, चौक, पाली येथील स्थानिकांसाठी खासदार विचारे यांनी नुकताच महापालिका आयुक्त दिलीप ढोले यांच्या सोबत नव्याने होत असलेल्या कोविड सेंटर उभारणीसाठी पाहणी दौरा आयोजित केला होता. पाहणी दौऱ्यात 80 बेडचे रुग्णालय सुरू करण्यात येणार असल्याची आयुक्तांनी माहिती दिली.