ठाणे : शेजारी असलेले दुकानदार एका पुतळ्याच्या वादातून पक्के वैरी झाल्याची घटना समोर आली आहे. लगतच्या दुकानाला अडचण ठरत असलेला पुतळा हटविण्यावरून एका दुकानदारासह त्याच्या दोन मुलांनी शेजारी असलेल्या दुकानदारासह दोन महिलांना दुकानात घुसून बेदम मारहाण ( Intruded and brutally beaten ) केली आहे. मारहाणीचा प्रकार सीसीव्हीटीत कैद ( beating caught on CCTV ) झाला आहे. याप्रकरणी रामनगर पोलिसांनी हल्लेखोर दुकानदार, त्याच्या दोन मुलांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
मारहाणीत तिघे जखमी..डोंबिवली पूर्वेकडील नेहरू क्रॉस फडके रोडला राजेंद्र शेलार यांचे कपड्यासह इतर साहित्य विक्रीचे दुकान आहे. त्याच दुकानाच्या बाजूला आरोपी देवराज पटेल यांचे देखील दुकान आहे. देवराज पटेल हे आपल्या दुकानातील कपड्याचा पुतळा शेलार यांच्या दुकानासमोर लावून जाणूनबुजून अडचण निर्माण करत होते. अनेकदा विनंती करूनही आरोपी देवराज हे काही ऐकत नव्हते. त्यातच मंगळवारी दुपारी पावणे दोनच्या सुमारास हा वाद उफाळून आला. त्यावेळी देवराज यांनी शेलार यांच्या दुकानाला लावून कपड्याचा पुतळा ठेवला. दुकानदार राजेंद्र शेलार यांनी पुतळा बाजूला हटवा, असे सांगितले. यावरून शाब्दिक बाचाबाची झाली. अखेर संतापलेल्या देवराज पटेल-दुबरिया, त्यांचे दोन मुले मयूर, प्रितेश यांनी राजेंद्र शेलार यांच्यासह पत्नी सुवर्णा, मेहूणी अंजना यांना छत्रीच्या साह्याने बेदम मारहाण केली. या मारहाणीत राजेंद्र शेलार, पत्नी सुवर्णा, मेहूणी अंजना असे तिघे जखमी झाले.