मीरा भाईंदर(ठाणे)- अत्यावश्यक्त काळात ठप्प असलेली परिवहन सेवा पुन्हा सुरू होण्याऐवजी वादाच्या भोवऱ्यात आली आहे. प्रशासनाने कंत्राटदाराला २ कोटी रुपये देयके देऊन देखील कंत्राटदाराने कर्मचाऱ्यांना पगार उपलब्ध करून दिलेला नाही. धक्कादायक बाब म्हणजे इतक्या गोंधळात कंत्राटदाराने अजून पैशांची मागणी केली असून, पालिका प्रशासन राजकीय नेत्यांच्या दबावाखाली त्याला पैसे उपलब्ध करून देण्याचा घाट रचत आहे. गेल्या सहा महिन्यांचा पगार अद्याप दिला नसल्याने कर्मचाऱ्यांनी पालिका मुख्य प्रवेशद्वारावर ठिय्या मांडला आहे.
कोरोनाच्या महामारीमुळे मार्च महिन्यापासून मीरा भाईंदर महानगरपालिकेची परिवहन सेवा बंद करण्यात आली होती. या महापालिकेची परिवहन सेवा खासगी तत्वावर चालवण्यात येत असून, याचा ठेका भागीरथी ट्रान्स कॉर्पोरेशन या कंपनीला १ ऑगस्ट २०१९ रोजी दिला आहे. पालिकेच्या सेवेत एकूण ७४ बसगाडया असून यापैकी ५ गाडया वातानुकुलीत आहेत. मीरा भाईंदर महानगरपालिका परिवहन सेवा चालविण्याकरिता ठेकेदारास प्रति किमी ४२ रुपये याप्रमाणे मोबदला देत आहे. यामुळे प्रवाशांच्या सोईकरिता महानगरपालिकेला लाखो रुपयांचा तोटा सहन करावा लागत आहे. मात्र, मार्च महिन्यापासून कोरोनाच्या साथीमुळे परिवहन सेवा ठप्प ठेवण्यात आली आहे.