ठाणे - रेल्वे रुळावर पडलेले हेडफोन शोधतांना दोन जणांना अंबरनाथ लोकलने जोरदार धडक ( Ambernath local ) दिली. यात एका जणाचा जागीच मृत्यू ( One died ) झाला असून एक जण गंभीर जखमी झाला आहे. लोकलच्या दरवाज्याजवळ प्रवास करताना हेडफोन पडल्याने दोघे मित्र कोपर रेल्वे स्थानकात उतरले. ते पुन्हा डोंबिवलीच्या दिशेने रेल्वे रुळावरून चालत असतांना कोपर-डोंबिवली स्थानकांदरम्यान दोघांनाही लोकलची धडक बसली. या अपघातात 16 वर्षीय मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर, एक जण गंभीर जखमी झाला आहे. डोंबिवली लोहमार्ग पोलिस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे.
पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, अहमदराजा हैदरअली शेख (16) असे रेल्वे अपघातात मृत्यू पावलेल्या मुलाचे नाव आहे. तर, सादिक शेख (17) हा या अपघातातून बचावला असून त्याच्यावर उपचार सुरू आहेत. मुंब्र्यात राहणारे हैदरअली, सादिक तसेच अन्य दोघे असे चार मित्र कल्याणहून मलंगगडावर दर्शनासाठी गेले होते. तेथून चौघे मित्र मुंब्र्याला जाण्यासाठी कल्याण रेल्वे स्थानकात २१ जून रोजी रात्रीच्या सुमारास लोकलमध्ये चढले. चौघेही रेल्वेच्या दरवाज्याजवळ उभे राहून प्रवास करत होते. लोकलने डोंबिवली रेल्वे स्थानक सोडल्यावर हैदरअलीचा हेडफोन रेल्वे रुळावर पडला होता. पडलेला हेडफोन घेण्यासाठी हैदरअली तसेच सादिक कोपर रेल्वे स्थानकात उतरले.