महाराष्ट्र

maharashtra

ETV Bharat / city

वाहतूक कोडींवर तोडगा; वाहतूक पोलीस आणि ठाणे महापालिकेचा अ‌ॅक्शन प्लॅन - thane marathi news

शहरात दिवंसेदिवस होणाऱ्या वाहतूक कोंडीवर ठाणे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची केडीएमसी प्रशासनासोबत बैठक पार पडली. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाने आजच्या बैठकीत अ‌ॅक्शन प्लॅन तयार केला आहे.

Breaking News

By

Published : Dec 22, 2020, 7:31 PM IST

ठाणे -शहरात दिवंसेदिवस होणाऱ्या वाहतूक कोंडीवर ठाणे वाहतूक विभागाच्या अधिकाऱ्यांची केडीएमसी प्रशासनासोबत बैठक पार पडली. वाहतूक कोंडीवर तोडगा काढण्यासाठी वाहतूक पोलीस आणि महापालिका प्रशासनाने आजच्या बैठकीत अ‌ॅक्शन प्लॅन तयार केला आहे. कल्याण - डोंबिवली महापालिका हद्दीतील प्रमुख रस्त्यांवर नित्य नियमाने वाहतूक कोंडी होत असल्याची ओरड नागरिकांकडून केली जात आहे. त्यातच शहरातील प्रमुख रस्त्यावरील दुकानदारांनी रस्त्यावरील फुटपाथवर साहित्य लावून फुटपाथवर ताबा केला आहे. तर बेशिस्त रिक्षाचालकही वाहतूक कोंडीत भर घालताना दिसत आहे.

प्रमुख मार्गावरील पूलावर वाहतूक कोंडी-

विशेष म्हणजे कल्याण डोंबिवली शहरात येणाऱ्या मार्गावरील पत्रीपूल , दुर्गाडी पूल, वालधुनी पूल, या पुलाचे अद्यापही काम अपूर्ण अवस्थेत आहे. या पुलावर मोठ्या प्रमाणात वाहतूक कोंडी होऊन वाहनांच्या रांगा लागलेल्या दिसून येतात. तसेच मुरबाड कल्याण मार्गावरील शहाड पूलावर देखील नेहमीच वाहतूक कोंडी होते. याच प्रमुख मार्गावरील वाहतूक कोंडीच्या समस्यांवर पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी आणि वाहतूक शाखेचे पोलीस उपआयुक्त बाळासाहेब पाटील यांच्यासह वाहतूक व महापालिका प्रशासन प्रमुख अधिकाऱ्यांची आज कल्याण डोंबिवली महापालिकेच्या स्थायी समितीच्या सभागृहात संयुक्त बैठक पार पडली.

अ‌ॅक्शन प्लॅनची उद्यापासून अंमलबजाणी सुरु-

नागरिकांना रस्त्यांवरुन व पदपथांवरुन कुठल्याही खोळंब्याशिवाय सहज चालता यावे, यासाठी शहरातील ज्या दुकादारांनी फुटपाथवर ताबा केला आहे. अश्या दुकानदारांवर महापालिकेने यापुर्वीच कारवाई सुरु केलेली आहे. त्याचप्रमाणे रस्त्यालगतची भंगार/बेवारस वाहने उचलण्याबाबतही महापालिकेने मोठी मोहिम सुरु केली आहे. त्यामुळे आता पदपथांवर अतिक्रमण करणाऱ्या दुकानदारांवर कडक कारवाईचे संकेत पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी आज वाहतूक पोलीस, स्थानीक पोलीस अधिकारी, वास्तुविशारद संघटनेचे पदाधिकारी व महापालिका अधिकारी, एम.सी.एच.आय. पदाधिकारी यांना दिले.

पार्किंग आणि सिग्नल तोडल्यास संबंधितांना ई-चलान -

या बैठकीत वाहतूक विभागाचे उप-आयुक्त यांनी महापालिका परिसरात कुठे साईन बोर्ड लावावेत, पार्कींगची व्यवस्था कशी असावी याबाबत उपयुक्त सुचना केल्या. त्यानुसार महापालिका लवकरच साईन बोर्ड लावण्याची व्यवस्था करणार आहे. पार्कींगसाठी महापालिकेच्या ताब्यात असलेल्या जागांचा वापर कशाप्रकारे करता येईल, याबाबत विचार केला जाईल. तसेच पी-1, पी-2 च्या पार्कींग व्यवस्था करण्यासाठी दुभाजक काढणेबाबत वाहतूक विभागाकडून प्राप्त सूचनांचा विचार केला जाईल, असे प्रतिपादन पालिका आयुक्त डॉ. विजय सूर्यवंशी यांनी यावेळी केले. वाहन तळावर जमा केलेल्या बेवारस वाहनांचे ई ऑक्शन करणे. रिफ्लेक्टेड जॅकेट वाहतूक पोलिसांना पुरविणे, चुकीच्या ठिकाणी पार्कींग केलेल्या गाडयांना जॅमर लावणे, अनावश्यक ठिकाणी असणारे दुभाजक काढणे, त्याचप्रमाणे काही रस्ते केवळ पादचाऱ्यांना चालण्यासाठी मोकळे ठेवणे, या विषयांवर या बैठकीत चर्चा झाली. महापालिकेने 7 ठिकाणी सिग्नल यंत्रणा उभी केली असून ते सिग्नल तोडल्यास संबंधितांना ई-चलान देण्याची व्यवस्था 15 दिवसांत करण्याचा प्रयत्न असल्याबाबतची माहिती पालिका आयुक्तांनी यावेळी दिली.

बैठकीस अतिरिक्त आयुक्त सुनील पवार, शहर अभियंता सपना कोळी (देवनपल्ली), वाहतूक पोलीस उपआयुक्त बाळासाहेब पाटील, पोलीस अनिल पोवार, अन्य पोलीस अधिकारी, महापालिका अधिकारी, आरटीओचे प्रतिनिधी, वास्तुविशारद संघटनेचे पदाधिकारी, एम.सी.एच.आय. संघटनेचे पदाधिकारी उपस्थित होते.

हेही वाचा-अदानी-अंबानीच्या उत्पादनावर शेतकऱ्यांचा बहिष्काराचा निर्धार

हेही वाचा-उद्धव ठाकरे देशाचं नेतृत्व करणार, भाजपला टीका करण्यात 'भारतरत्न' द्या - संजय राऊत

ABOUT THE AUTHOR

...view details