ठाणे - रस्त्याच्या कडेला, नो पार्किंगमध्ये उभी केलेली वाहने, विशेषत: दुचाकींविरोधात केल्या जाणाऱ्या ‘टोइंग’च्या कारवाईत शिस्त आणण्याचा निर्णय ठाणे पोलिसांच्या वाहतूक शाखेने घेतला आहे. या टोइंगच्या कारवाईसाठी मदत घेतली जाणाऱ्या टोइंग कंत्राटदारासमवेतच्या करारात नमूद असलेल्या सर्व अटींचे काटेकोर पालन करण्याची ठाम भूमिका वाहतूक शाखेचे उपायुक्त बाळासाहेब पाटील यांनी घेतली आहे. त्यामुळे आता वाहन उचलून नेण्यापूर्वी टोइंगच्या गाडीतून उद्घोषणा केली जाणार आहे. तसेच उचललेल्या वाहनाच्या जागी वाहतूक शाखेचा स्टीकर लावण्यात येणार आहे. या स्टीकरवर संबंधित वाहतूक चौकीचे नाव व दूरध्वनी क्रमांक असणार आहे, जेणेकरून वाहनधारकाला आपले वाहन नेमके कुठल्या चौकीवर नेण्यात आले आहे, याबाबत संभ्रम राहाणार नाही. तसेच, या संपूर्ण कारवाईचे व्हिडिओ चित्रिकरणही करण्यात येणार आहे. १ जानेवारीपासून याची अंमलबजावणी केली जाणार आहे.
संभ्रम निर्माण होणार नाही
वाहनधारक आणि टोइंग ऑपरेटर यांच्यात अनेकदा वाद झालेले दिसून येतात. अनेकदा गाड्यांचे नुकसान झाल्याची तक्रारही केली जाते. वाहनचालक जागेवर उपस्थित असला तरी वाहन उचलून नेले जाते. वाहन नेल्यानंतर खडूने त्याजागी सांकेतिक भाषेत लिहिले जाते, ती भाषा वाहनचालकाच्या परिचयाची नसल्यामुळे आपले वाहन नेमके कुठे नेले आहे, याचा थांगपत्ता वाहनचालकाला लागत नाही. तसेच अनेकदा हे खडूचे मार्किंग पुसले गेल्यामुळे वाहन चोरीला गेले, की वाहतूक पोलिसांनी उचलून नेले, याबाबतही संभ्रम निर्माण होऊन वाहनचालक सैरभैर होतात. अनेकदा त्यांना कुठे जायचे कुठे संपर्क करायचा हे माहिती नसते.