ठाणे -पोटातील आतड्या हाताने सावरत चालणाऱ्या व्यक्तीचा व्हिडीओ व्हायरल झाल्याने मोठी खळबळ उडाली. हि घटना ठाण्यातील खारकर आळी या गजबजलेल्या भागात घडली. ठाण्यातील मध्यवर्ती ठिकाणी असलेल्या खारकर आळी भागात नीलम हाउसिंग सोसायटीमध्ये सुरक्षारक्षक आणि पाणी सोडण्याचे काम करणारा 49 वर्षीय पद्मबहादुर थकोला हा आपल्या कुटुंबासहित इमारतीच्या खाली एका खोलीत राहतो. काल दुपारी त्याच्याच गावात राहणारा इंद्रमोहन भारमले बुडा हा पद्मबहादूर याच्या घरी आला व आपल्याला त्याच्या घरात राहायला देऊन आपल्या खाण्यापिण्याची व्यवस्था करण्यास सांगितले. पद्मबहादूर याने या गोष्टीस नकार देताच त्यांच्यात मोठा वाद झाला आणि रागाच्या भरात इंद्रमोहन याने भाजी कापायचा सुरा घेऊन पद्मबहादूर याच्या पोटात खुपसला.
इंद्रमोहन याने केलेला वार इतका भयानक होता की त्यामुळे पद्मबहादुर च्या पोटातील आतडेच बाहेर आले. हल्ला केल्यानंतर इमारतीतून बाहेर पडलेल्या इंद्रमोहन याला पोलिसांनी स्थानिकांच्या मदतीने ताब्यात घेतले व पद्मबहादूर याला कळवा येथील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. पद्मबहादूरवर शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मात्र त्याची प्रकृती चिंताजनक आहे. तर आरोपी इंद्रमोहन याच्यावर कलम 307 नुसार ठाणे नगर पोलिसांनी गुन्हा दाखल केल्याचे सांगितले आहे.